पुण्याचे नेतृत्व करण्याची मुरलीधर मोहोळ यांना संधी; जगन्नाथराव जोशी ते नव्या पिढीचे मुरलीधर मोहोळ पुणे भाजपचा प्रवास

राजेंद्र पंढरपुरे
पुणे – नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांना पदार्पणातच केंद्र सरकारमध्ये राज्य मंत्रीपद मिळाले आहे. पुण्याचे नेतृत्व करण्यासाठी मोहोळ यांना ही संधी मिळाली आहे.
सद्यस्थितीत पुणे शहरात भाजपची राजकीय ताकद मोठी आहे. या पक्षाचे पाच आमदार आहेत आणि राज्यसभेच्या एक सदस्य आहेत. तीन माजी खासदार, एक माजी आमदार, एक माजी केंद्रीय मंत्री, राज्यातील एक माजी मंत्री पुण्यात आहेत. सध्या महापालिका अस्तित्वात नाही. पण, मागील महापालिकेत भाजपचे सुमारे १०० नगरसेवक होते. भाजपची एवढी मोठी राजकीय टीम खासदार या नात्याने मोहोळ यांना उपलब्ध आहे. या सर्वांना एकत्र ठेऊन मोहोळ यांनी नेतृत्व करावे, अशी भाजप नेत्यांची अपेक्षा आहे. ५० वर्षीय मोहोळ यांच्या हातात पुढील काळातील किमान २० वर्षे आहेत. या मोठ्या कालावधीत त्यांनी स्वतःचे नेतृत्व रुजवायला हवे.

भारतीय जनता पक्षाची स्थापना १९८० साली झाली. त्यानंतर पुण्यात अण्णा जोशी, अरविंद लेले, प्रकाश जावडेकर, अनिल शिरोळे, गिरीश बापट, विश्वास गांगुर्डे, शंकरराव यादव, विक्रम राठोड, गोविंदराव मालशे, योगेश गोगावले, विजय काळे, दिलीप कांबळे, उज्वल केसकर, सुरेश नाशिककर, सुहास कुलकर्णी, शाम सातपुते, त्र्यंबक आपटे, अशोक साळुंके, गोपाळ चिंतल आदी नेत्यांनी पक्षाची धुरा अनेक वर्षे सांभाळली. यापैकी अरविंद लेले आमदार झाले. गांगुर्डे नगरसेवक, आमदार झाले. काळे नगरसेवक, भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष, पक्षाचे शहराध्यक्ष, आमदार झाले. दिलीप कांबळे आमदार , राज्यात मंत्री झाले. अण्णा जोशी नगरसेवक, आमदार, खासदार, पक्षाचे शहराध्यक्ष झाले. प्रकाश जावडेकर पक्षाचे प्रवक्ते, राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष, राज्यसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री झाले. अनिल शिरोळे नगरसेवक, पक्षाचे शहराध्यक्ष, खासदार झाले. बापट नगरसेवक, आमदार, राज्यात कॅबिनेट मंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार झाले. साधारणतः २०१९ साला पर्यंत या पिढीने भाजपच्या वेगवेगळ्या धुरा सांभाळल्या. दरम्यानच्या काळात पक्षात नवे नेतृत्व निर्माण झाले. २०१४ साली देशभरात मोदी लाट आली. अनेक युवक भाजपकडे आकर्षित झाले, भाजप समाजाच्या सर्व स्तरात विस्तारला. देशातील सर्वात मोठा आणि सत्ताधारी पक्ष अशी त्याची ओळख निर्माण झाली.



भारतीय जनता पक्षातर्फे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविणारे पहिले उमेदवार कै.जगन्नाथराव जोशी होते. संघ निष्ठा, पक्ष निष्ठा, विद्वत्ता, चौफेर वक्तृत्व, अतिशय साधी रहाणी आणि ध्येयवादी वाटचाल या गुणांमुळे जगन्नाथराव जोशी यांनी पुणेकरांवर छाप पाडली. पदार्पणातच जगन्नाथराव जोशी यांच्यामुळे जनमानसात भाजपची चांगली प्रतिमा निर्माण झाली. त्या निवडणूक काळात वृत्तसंस्थेच्या एका प्रतिनिधीने गप्पांच्या ओघात सांगितले की, ‘जगन्नाथरावांचा बायोडाटा पाहून माझी पत्नी अतिशय प्रभावित झाली’. हा अभिप्राय जगन्नाथरावांचे निवडणुकीतील महत्त्व आणि पक्षाचे भवितव्य या दृष्टीने सूचक होता. ना. मोहोळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जगन्नाथराव जोशी यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांनी लढविलेली निवडणूक याचा अभ्यास करायला हवा. नेतृत्वाच्या संदर्भात कै.रामभाऊ म्हाळगी यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. रामभाऊ म्हाळगी यांची कार्यपद्धती, संघटन कौशल्य, लोकांशी संबंध ठेवण्याची पद्धत अनोखी होती. त्यांच्या कार्यपद्धतीची छाप भाजपच्या दोन पिढ्यांवर राहिली. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी रूपाने त्यांचे स्मारक उभे राहिले. एवढे मोठे कर्तृत्व त्यांनी गाजविले. अण्णा जोशी, अरविंद लेले ही आमदारांची जोडी महाराष्ट्रात प्रसिद्ध होती. पक्षाबाहेरचीही मते मिळविण्याची हातोटी आणि लोकप्रियता अण्णा जोशी यांच्याकडे होती. कै.जगन्नाथराव जोशी आणि अण्णा जोशी हे दोघेही काँग्रेसचे दिग्गज उमेदवार बॅ.विठ्ठलराव गाडगीळ यांच्या विरोधात निवडणूक लढले, हे ही नव्या पिढीने लक्षात घ्यायला हवे.



अलीकडच्या काळात पुण्याचे नेतृत्व म्हटल्यावर खासदार सुरेश कलमाडी यांचे नाव एकमुखी घेतले जाते. अनेक उपक्रमांमधून त्यांनी पुण्याचे नेतृत्व केले आणि रुजविले. २०१२ साली ते राजकारणातून बाजूला झाले असले तरी, आजही सर्व पक्षातील कार्यकर्ते नेता म्हणून कलमाडी यांचे नाव घेतात. ना.मुरलीधर मोहोळ यांनी कलमाडी यांचा काळ नगरसेवक म्हणून पाहिलेला आहे. त्यामुळे मोहोळ यांना कलमाडी यांच्या नेतृत्वगुणाचा अभ्यास वेगळा करावा लागणार नाही. संघटना आणि लोकप्रतिनिधी यांच्यावर कलमाडी यांची पकड होती. पुण्यातील विविध संस्थांशी ते जोडलेले होते.



भारतीय जनता पक्षाने मोहोळ यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकलेला आहे. उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस हे मोहोळ यांच्या पाठिशी आहेत. त्यांनीच पुढाकार घेऊन मोहोळ यांच्या प्रगतीला हातभार लावलेला आहे. पुण्याचे माजी महापौर म्हणून पुणे शहराचा आवाका मोहोळ यांच्या लक्षात निश्चितच आलेला असेल. मेट्रो, नदी सुधारणा, रिंग रोड, विमानतळ आदी मोठे प्रकल्प मार्गी लावण्यावर फडणवीस यांनी भर दिला. मोहोळ यांनी ते प्रकल्प गतीमान होण्यासाठी आपल्या मंत्रीपदाचा उपयोग करून घ्यायला हवा. एकेकाळी पेन्शनरांचे पुणे अशी ओळख असलेले हे शहर अलीकडे आयटी हब म्हणून ओळखले जाऊ लागले आणि आता महानगराच्या दिशेने या शहराची वाटचाल चालू आहे. पुणे शहरातून दरवर्षी सुमारे १कोटी प्रवासी विमान प्रवास करतात. गगनचुंबी इमारती पुणे शहरात होत आहेत. शैक्षणिक क्षेत्राचाही मोठा विस्तार होतोय. पुण्याची ही नवी ओळख लक्षात घेऊन महानगराच्या अपेक्षा आणि गरजा पूर्ण करण्यासाठी मोहोळ यांना भर द्यावा लागेल.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना पुण्यातील भाजपच्या काही नेत्यांनी कर्तुत्व सिद्ध केले, अशांमध्ये मोहोळ यांचेही नाव घ्यावे लागेल. पक्षाने आणि पुणेकरांनी नेतृत्वाची संधी मोहोळ यांना दिली आहे, आगामी काळात त्यांनी नेतृत्व रुजवावे, अशी अपेक्षा राहील.
























