वारजे गणपती माथा ते मनपा गर्दीच्या वेळी महिला व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र बस सेवा सुरू करा..

वारजे : सकाळची वेळ कामाला, कॉलेज जाताना बसच्या त्या प्रचंड गर्दीतून करावा लागणारा प्रवास, सायंकाळी घरी येताना ही तीच परिस्थिती. या प्रकारामुळे महिला व विद्यार्थिनींचे प्रचंड हाल होत असल्याने वारजे गणपती माथा ते मनपा या मार्गावर गर्दीच्या वेळी महिलांसाठी पी एम पी एल ने स्वतंत्र बस सेवा सुरू करावी अशी मागणी होऊ लागली आहे.
या मागणी संदर्भातील निवेदन माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांच्याकडून पीएमपीएल च्या व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आले आहे. बस प्रवासात महिला व विद्यार्थिनींची होणारी प्रचंड गैरसोय तातडीने दूर करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.




धुमाळ यांनी म्हंटले आहे की, वारजे माळवाडी गणपती माथा ते मनपा भवन या व इतर मार्गावर अनेक बस सेवा सुरू आहेत. परंतु महिला व शालेय विद्यार्थिनी यांना प्रवास करण्यासाठी स्वतंत्र अशी कोणतीही बस सेवा उपलब्ध नाही. सध्या जून महिना सुरू आहे शाळा, कॉलेज सुरू झाले आहेत. तसेच पावसाळा पण सुरू होत आहे. पावसाच्या दिवसात बसमध्ये प्रवास करण्यासाठी नागरिकांची खूप गर्दी असते. त्यात शाळकरी व कॉलेज मधल्या विद्यार्थिनी तसेच ऑफीस काम काजासाठी बाहेर पडलेल्या महिला या सर्वांना अश्या गर्दीमध्ये प्रवास करण्यासाठी अनेक वेळा अडचण निर्माण होते.



त्याच बरोबर ज्येष्ठ महिला असतील त्यांना काहीवेळेस गर्दी मुळे बसण्यासाठी जागा मिळत नाही. गर्दीमुळे बसमध्ये अनेक गैरप्रकार होत असतात अशात महिला व लहान मुली, विद्यार्थिनी यांच्या सुरक्षतीतेचा ही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे महिला व शालेय विद्यार्थीनी किंवा ज्येष्ठ महिला यांना प्रवासासाठी अडचण किंवा त्रास निर्माण होऊ नये यासाठी तातडीने वारजे माळवाडी गणपती माथा ते मनपा भवन या मार्गावर महिला व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र बस सेवा सुरू करून देण्यात यावी अशी मागणी धुमाळ यांनी पीएमपीएल प्रशासनाकडे केली आहे.







































