एन डी पाटील चालते बोलते विद्यापीठ… कार्य परिचय

सांगली जिल्ह्यातील ढवळी (नागाव) येथे त्यांचा जन्म झाला. एन डी पाटील यांचे संपूर्ण नाव नारायण ज्ञानदेव पाटील होते. संपूर्ण महाराष्ट्राला ते एन डी पाटील याच नावाने परिचित होते. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एनडींनी अर्थशास्त्रात एमए केल्यानंतर पुणे विद्यापीठातून एलएलबीची पदवी घेतली. त्यानंतर ते अध्यापन क्षेत्रात कार्यरत होते. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ व रयत शिक्षण संस्थेत त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली होती. राजकीय क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला होता. 1948 साली शेतकरी कामगार पक्षात त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर पक्षाच्या सरचिटणीस पदापर्यंत मजल मारली.
तब्बल 18 वर्षे ते महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सदस्य होते. 1978 ते 1980 या काळात त्यांनी राज्याचे सहकार मंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. राज्य विधानसभेत त्यांनी कोल्हापूरचे प्रतिनिधित्व केले होते. राज्यात 1999 साली आलेल्या लोकशाही आघाडी सरकारचे ते निमंत्रक होते. विधिमंडळाचे सदस्य म्हणून सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांनी पोटतिडिकीने मांडले.
लोकांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यासाठी त्यांचा नेहमी पुढाकार असे. सीमाभागातील मराठी भाषिकांविषयी एन. डी. पाटील यांना प्रचंड आस्था होती. त्या चळवळीत ते अखेरपर्यंत सक्रिय होते. सीमा भागातील मराठी भाषिकांना त्यांना मोठा आधार वाटे. एन. डी. पाटील देखील सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायाविरोधात सातत्याने आवाज उठवत. त्याशिवाय, लोकांसाठी झालेल्या अनेक लढ्यांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले
होते.




