राष्ट्रवादीचा महापालिका निवडणुकीचा शुभारंभ कर्वेनगर मधूनच ; शरद पवार काय बोलणार याची उत्सुकता…

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्वेनगर मधील शरद पवार यांच्या कार्यक्रमाला वेगळे महत्त्व
अमोल साबळे
पुणे : पुणे महापालिका निवडणुक जवळ आली असताना कर्वेनगर मध्ये ४ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार Sharad Pawar यांच्या उपस्थितीत पार पडत असलेल्या कार्यक्रमाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांच्या पाठपुराव्यातून झालेल्या महापालिकेच्या भारतरत्न, माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुलचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते या दिवशी होत आहे. बऱ्याच काळानंतर कर्वेनगर मध्ये येत असलेले शरद पवार या कार्यक्रमात काय बोलणार याबाबत आतापासूनच सर्वांना उत्सुकता लागलेली आहे.
पुणे महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे, त्यामुळे सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले असल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पक्षाकडून चांगली तयारी करण्यात येत असल्याचे दिसत आहे. कर्वेनगरमधील कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांचीही उपस्थिती असणार आहे.
कर्वेनगर आणि वारजे माळवाडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा मोठा मतदार आहे. त्यामुळेच मागील २०१७ च्या महापालिका निवडणुकीत ज्या परिसरात हा कार्यक्रम होत आहे. त्या प्रभाग क्रमांक ३१ मधून राष्ट्रवादीच्या लक्ष्मी दुधाने व शेजारील प्रभाग क्रमांक ३२ मधून नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, नगरसेविका दिपाली धुमाळ व सायली वांजळे ह्या निवडून आल्या होत्या. महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेला शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे हा परिसर देखील वरील भागाला लागून आहे. त्यामुळे या सर्व भागांतून राष्ट्रवादीचे जास्त उमेदवार निवडून आणण्याचे उद्दिष्टे राष्ट्रवादीचे असणार आहे.
मागील पंधरा दिवसापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वारजे येथे विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांच्या प्रयत्नातून तसेच वनविभाग व पुणे महापालिका यांच्या माध्यमातून ३५ एकर जागेत होत असलेल्या संजीवन वनोद्यानाचा भूमिपूजन समारंभ पार पडला होता. हे वनोद्यान वारजे बरोबरच कर्वेनगर, कोथरुड भागातील नागरिकांसाठी फायद्याचे राहणार आहे. आगामी काही दिवसात काही महत्वाच्या प्रकल्पाची उद्घाटने या भागात होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी या भागात कामांचा धडाका लावणार असल्याचे दिसत आहे.
कर्वेनगर मध्ये होत असलेले माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुल हे या भागातील सर्वसामान्य पालकांसाठी फायद्याचे ठरणार आहे. नगरसेविका लक्ष्मी दुधाने व राष्ट्रवादीचे कोथरुड मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प साकारत असताना त्यांच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाची चर्चा सर्वत्र होती, आणि आता जेव्हा या ई लर्निंग स्कूल चे काम पूर्ण झाले आहे तेव्हा हे महापालिकेचे ई लर्निंग स्कूल
खाजगी शाळांना ही मागे टाकेल अशी चर्चा या भागात सुरू आहे.
मा.राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सरांच्या प्रेरणेने शिक्षणाचा प्रवाह गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहचावा हे स्वप्न आम्ही पाहिले होते. सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा हा आमचा प्रयत्न डॉ.कलाम सरांच्या स्वप्नपूर्तीत खारीचा वाटा उचलेल, याचा आम्हाला विश्वास आहे असे नगरसेविका लक्ष्मी दुधाने व स्वप्नील दुधाने यांनी सांगितले आहे.




