सायकल मिळाल्याने गरजु विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव ; नगरसेविका लक्ष्मी दुधाने व स्वप्नील दुधाने यांचा स्तुत्य उपक्रम

कर्वेनगर : नागरिकांनी आपल्या सोसायटीतील, आजूबाजूच्या परिसरातील बंद आणि नादुरुस्त असलेल्या सायकली आम्हाला आणून द्याव्यात, असे आवाहन नगरसेविका लक्ष्मी दुधाने व राष्ट्रवादीचे कोथरुड मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांनी कर्वेनगर वारजे प्रभाग क्रमांक ३१ मधील नागरिकांना केले होते. या आवाहनाला प्रतीसाद देत अनेक नागरिकांनी सायकली आणून दिल्या. योग्य दुरुस्ती करून या जमा झालेल्या सायकलींचे वाटप गरजू विद्यार्थ्यांमध्ये करण्यात आले. यावेळी सायकल मिळाल्यानंतर या विद्यार्थ्यांचा आनंद पाहण्यासारखा होता. Happiness on the faces of needy students for getting bicycles; Commendable activities of Corporator Lakshmi Dudhane and Swapnil Dudhane
आज अनेक विद्यार्थ्यांना, लहान मुलांना आपल्याकडे सायकल असावी असं वाटतं असतं पण घराच्या परिस्थितीमुळे त्यांना त्या मिळत नाहीत. तर दुसरीकडे अनेक सोसायट्यांमध्ये मुले मोठी झाल्याने त्यांच्या चांगल्या सायकली धूळ खात पडलेल्या असतात. या पडून खराब होत चाललेल्या सायकली जर गरजू मुलांना मिळाल्या तर नक्कीच त्याचा चांगला फायदा होईल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन नगरसेविका लक्ष्मी दुधाने व स्वप्नील दुधाने यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांना आपल्याकडील बंद आणि नादुरुस्त असलेल्या सायकल आम्हाला आणून द्याव्यात, असे आवाहन केले होते.
या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत परिसरातील नागरिकांनी दुधाने यांच्याशी संपर्क करून नादुरुस्त आणि बंद पडलेल्या सायकली सेवाभावनेच्या वृत्तीने आणून दिल्या. ओंकार चॅरीटेबल ट्रस्ट व नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांनी स्वखर्चाने जमा झालेल्या एकूण 40 सायकली दुरुस्त केल्या. प्रभागातील वस्ती भागातील गोरगरीब, गरजू विद्यार्थी शोधून त्या सर्व विद्यार्थ्यांना ‘मदतीचा एक हात’ म्हणून या सायकलींचे लक्ष्मी दुधाने यांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले.

यावेळी कोथरूड विधानसभा अध्यक्ष स्वप्नील दुधाने, उपाध्यक्ष संतोष बराटे, कोथरूड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष प्रमोद शिंदे, कामगार सेल अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, व्हीजेएनटी सेलचे पदाधिकारी विष्णू सरगर, प्रभाग अध्यक्ष किशोर शेडगे तसेच विद्यार्थी व पालक उपस्थिती होते.



स्वप्नील दुधाने म्हणाले की, मोफत सायकल भेट दिल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो पाहण्यासारखा होता. त्यामुळे हा उपक्रम राबविण्याचे समाधान मिळाले. तसेच ज्या नागरिकांनी त्यांच्याकडे पडून असलेल्या सायकली आम्हाला आणून दिल्या त्यांचेही मी आभार मानतो.



