मुख्यमंत्र्यांनी सही केल्यानंतर फाईलमधला शेराच बदलला; धक्कादायक प्रकार

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thakceray) यांनी सही केलेल्या मंत्रालयातील एका महत्त्वाच्या फाईलमधील मजकूर परस्पर बदलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची चौकशी केली असता या फाईलवर मुख्यमंत्र्यांनी सही केल्यानंतर त्याच्यावरती असणाऱ्या मजकुरात कोणीतरी फेरफार केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. या सगळ्याचा छडा लावण्यासाठी मरीनड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Shera changed the file after the CM signed it; Shocking type)
‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधीक्षक अभियंत्याची चौकशी करण्याचे आदेश काढले होते. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संबंधित फाईलवर सहीदेखील केली होती. मात्र, त्यानंतर या फाईलमधील मजकूर परस्पर बदलण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी सही केलेल्या सही केलेल्या वरच्या भागात लाल पेनाने एक अतिरिक्त मजकूर लिहण्यात आला होता. त्यामध्ये संबंधित अभियंत्याची चौकशी बंद करावी, असे म्हटले होते. साहजिकच हा प्रकार उघड झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली. या सगळ्या प्रकाराबद्दल सध्या वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री मौन बाळगून आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी एखाद्या फाईलवर सही करण्याला खूपच महत्त्व आहे. हा सरकारचा अंतिम निर्णय मानला जातो. त्यानंतर संबंधित निर्णयात सहसा कोणता बदल होत नाही. मुख्यमंत्र्यांच्या एका सहीमुळे कोट्यवधी रुपयांचा निधी हस्तांतरित केला जातो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सही केलेल्या फाईलमधील मजकुराशी अशाप्रकारे छेडछाड होणे, खूपच गंभीर बाब मानली जात आहे.



