महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या आवाहनाला पुणेकरांचा प्रचंड प्रतिसाद ; रक्तदानाला अलोट गर्दी

पुणे : pune city पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी रक्तदानासाठी केलेल्या आवाहनाला पुणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला असून शहराच्या कानाकोपऱ्यातून येऊन लोक रक्तदान करत आहेत. शुभारंभ लॉन्स या ठिकाणी सुरू असलेल्या या महारक्तदान शिबिराच्या ठिकाणी सकाळपासूनच रक्तदानासाठी गर्दी झाली आहे. रक्तदानासाठी येणाऱ्या नागरिकांचा ओघ सुरूच आहे.
कोरोना व सुरू असलेल्या लसीकरणामुळे रक्तदान होत नसल्याने शहरात पाच दिवस पुरेल एवढाच रक्त साठा शिल्लक आहे. त्यामुळे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या वाढदिवसादिवशी हार, बुके, केक नको रक्तदान करा असे आवाहन करत महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या रक्तदान शिबिराला पुणेकर लोटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रक्तदानाला गर्दी होत असली तरी योग्य नियोजनामुळे रक्तदानासाठी येणाऱ्यांची उत्तम व्यवस्था केली जात असून रक्तदान सुरळीत पार पडत आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही कन्या सिध्दीसह रक्तदान करत रक्तदान शिबिराचा प्रारंभ केला.
मोठ्या संख्येने रक्तदान होणार असल्याने त्या पद्धतीनेच शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर सुरू राहणार असल्याने दिवसभरात किती रक्तदाते रक्तदान करणार या संख्येबाबत उत्सुकता लागलेली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांचा पुणे शहरात मोठा मित्र परिवार आहे. तसाच त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळे या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.







