कोथरूड मतदारसंघात महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजय डाकले यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
कोथरूड : कोथरूड विधानसभा मतदार संघात महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विजय डाकले निवडणुकीची जय्यत तयारी करत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीत या मतदार संघात भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे निवडणूक लढवण्यासंदर्भात विजय डाकले काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
कोथरूड मतदार संघातून चंद्रकांत यांना आज उमेदवारी जाहीर झाली. महायुतीतील पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय डाकले हे पदाधिकारी आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या कामांवर टीकेची झोड उठवत डाकले यांनी निवडणुकीच्या रिंगणात आपण प्रमुख दावेदार असल्याचे मागेच दाखवून दिले आहे. महायुतीतील नेत्यालाच त्यांनी सुरुवातीपासून टार्गेट केल्याने कोथरूड मध्ये महायुतीत बिघाडी होणार का अशा चर्चा तेव्हापासून रंगू लागल्या होत्या.
विजय डाकले यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व इतर वरिष्ठांना भेटून कोथरूड मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली ताकद असल्याने तो आपल्या पक्षासाठी सोडून घ्यावा व आपण हा या मतदारसंघात निवडणूक लढवण्यास तयारी करत असल्याची माहिती दिलेली होती. मात्र भाजपचा आमदार असताना हा मतदार संघ महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार नाही हे नक्की होते आणि आज या मतदार संघात भाजपचा उमेदवारही जाहीर करण्यात आलेला आहे.
भाजपचा उमेदवार जरी जाहीर झाला असला तरी विजय डाकले ज्या पद्धतीने निवडणुकीची तयारी करत आहेत त्यावरून तरी ते मागे हटतील असे आतातरी दिसत नाही. मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला नसल्याने डाकले काय भूमिका घेणार, महायुतीचे बंडखोर म्हणून लढणार का इतर कोणत्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेणार हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. या निवडणुकीत डाकले यांची भूमिका महत्वाची राहणार आहे.
डाकले यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वाटप संस्कृती व केलेल्या जत्रा यात्रा यावर बोट ठेवत मतदार संघात नवा पायंडा पाडला जात असून विकास कामे केली असती तर हे करण्याची वेळ आली नसती असा थेट आरोप पाटील यांच्यावर पत्रकार परिषदेत करत एकच आठ दिवसांपूर्वी खळबळ उडवून दिलेली होती.
राजकारणातील बड प्रस्त, भाजपचे नेते असल्याने चंद्रकांत पाटील यांच्यावर स्थानिक पातळीवर आतापर्यंत कोणी टीका केलेली नव्हती. पाटील यांच्या विरोधात लढण्यासाठी तयारी करत असलेल्या उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेने कडूनही आतापर्यंत पाटील यांच्या बाबतीत मावळ भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे, मात्र असे असताना डाकले यांनी केलेल्या विरोधामुळे कोथरूड मतदार संघाचे वातावरण ढवळून निघाले आहे.
बहुजन समाजाचा स्थानिक चेहरा म्हणून विजय डाकले यांच्याकडे पाहिले जाते. समाजातील प्रत्येक स्तरामध्ये त्यांचा संपर्क आहे. कोथरूड मतदार संघात मोठ्या प्रमाणात असलेल्या वस्ती भागात त्यांना मानणारा वर्ग आहे. त्यामुळे ते निवडणुकीत असणे कोथरूड बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते, कारण कोथरूड मतदार संघात झोपडपट्टी भागातही भाजपचा मतदार आहे आणि हा भाजपचा मतदार डाकले यांच्यामुळे विभागाला गेला तर त्याचा फटका भाजपच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता जास्त आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थानिक भूमिपुत्राला संधी देईल अशी भूमिका विजय डाकले पत्रकार परिषदेत मांडली होत. त्यांनी स्थानिक भूमिपुत्र या शब्दावर दिलेला जोर यामुळे येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा स्थानिक आणि बाहेरचा मुद्दा चर्चेला येणार असल्याचे दिसत आहे.
विजय डाकले हे अजित पवारांच्या जवळचे कार्यकर्ते आहेत. महायुतीत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून किंवा स्वतः अजित पवार यांच्याकडून विजय डाकले यांना थांबवण्यासाठी प्रयत्न होऊ शकतो अशा वेळी निवडणुकीची जोरदार तयारी करत असलेले डाकले काय भूमिका घेणार हे पाहावे लागणार आहे.