“मीच भुजबळांना तुरुंगातून बाहेर काढलं” : प्रकाश आंबेडकर

पुणे : माझी छगन भुजबळ यांच्याबद्दल नाराजी नाही. उलट त्यांना तुरुंगातून बाहेर काढणारा मीच आहे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यातल्या फुले वाड्यात जाऊन त्यांना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बातचीत केली.

यावेळी ओबीसी आरक्षणावर बोलताना आंबेडकर म्हणाले, छगन भुजबळांची भूमिका मंडल आयोगाच्या विरोधात होती. म्हणून मी तुम्हाला (पत्रकार) सांगतोय की आधी इतिहास शोधा आणि तो लोकांसमोर आणा.
प्रकाश आंबेडकर यांच्या संविधान सन्मान महासभेतील वक्तव्यानंतर छगन भुजबळ प्रसारमाध्यमांसमोर म्हणाले होते की माझी प्रकाश आंबेडकरांबद्दल नाराजी नाही. त्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, माझीही त्यांच्याबद्दल नाराजी नाही. उलट त्यांना तुरुंगातून बाहेर काढणारा मीच आहे.



वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले, ते न्यायाधीश त्यावेळी भुजबळांना तुरुंगाबाहेर सोडत नव्हते. न्यायपालिका त्यांचा जामीन नाकारत होती. त्यावेळी मीच उलटा वार केला होता. न्यायपालिका जर व्यवस्थित वागली नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही भुजबळांबद्दलचा निर्णय घेतला नाही तर संबंधित न्यायाधीशावर खटला चालवता येऊ शकतो, हे लक्षात घ्यावं असं मीच बजावलं होतं. त्याच्या पुढच्या दिवशी भुजबळांना सोडून देण्यात आलं. परंतु, भजबळ यांनी कधीच माझे आभार मानले नाहीत.






