पुणे शहर

प्रशांत दामले आणि गौरी दामले यांना यशवंत-वेणू पुरस्कार प्रदान..

दिलीप प्रभावळकर यांना जीवन गौरव पुरस्कार

कोथरूड : यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मी आजपर्यंत अनेक नाट्यप्रयोग केले. येथील प्रत्येक प्रयोग रंगलेला आहे. ही या वास्तूचीच किमया आहे.’ अशा भावना ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी व्यक्त केल्या.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कोथरूड शाखेचा वर्धापन दिन तसेच यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन यानिमित्त आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून यशवंत-वेणू पुरस्काराने सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले आणि गौरी प्रशांत दामले यांचा दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी प्रभावळकर बोलत होते. प्रभावळकर यांचा या वेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. मानपत्र, दहा हजार रुपये, शाल, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. तर यशवंत वेणू पुरस्काराचे स्वरूप पंधरा हजार रुपये, मानपत्र, शाल, स्मृतीचिन्ह असे होते.  ‘प्रशांत व गौरी दामले यांना यशवंत वेणू पुरस्काराने सन्मानित करताना मला अतिशय आनंद, समाधान होत असल्याचे प्रभावळकर यावेळी म्हणाले.

Img 20250508 wa00015038950216212096978

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला यावेळी माजी कृषीमंत्री शशिकांत सुतार, नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, प्रमुख कार्यवाह सत्यजित धांडेकर, उपाध्यक्ष समीर हंपी, दीपक गुप्ते मंचावर होते. पुणे महापालिकेच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कुटुंब किर्रतन (सर्वोत्कृष्ट नाटक), ठकीशी संवाद (सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक), दोन वाजून बावीस मिनिटांनी (विशेष लक्षवेधी नाटक) तसेच संदेश कुलकर्णी (सर्वोत्कृष्ट लेखक), विजय केंकरे (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक), संकर्षण कऱ्हाडे (सर्वोत्कृष्ट अभिनेता), शुभांगी गोखले (सर्वोत्कृष्ट अभिनेत्री), दत्ता शिंदे (पडद्यामागील कलाकार) यांचा या वेळी यशवंत सन्मानाने  मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

दिलीप प्रभावळकर म्हणाले, आजच्या मालिकांच्या भाऊगर्दीत रंगभूमीचे निशाण टिकविणारा सेनापती म्हणजे प्रशांत दामले हा होय. त्याचा रंगभूमीवरील वावर चैतन्य आणि उर्जा निर्माण करणारा असतो. त्याची रंगभूमीवरील निष्ठा आणि स्वत:ला कामात झोकून देऊन काम करण्याची पद्धत इतरांसाठी मार्गदर्शक आहे. उत्तम अभिनयाबरोबरच गायन कलेची देणगी प्रशांत दामले यांना लाभलेली आहे. त्यामुळे स्वत:तील गायकाला न्याय देत त्यांनी आपली नाट्यक्षेत्रातील वाटचाल सुरू ठेवावी.

Img 20251125 wa00126624322614302660332

प्रशांत दामले म्हणाले, ‘नाट्य क्षेत्रात काम करत असताना पत्नी गौरीची खंबीर साथ लाभली त्यामुळेच मला यश मिळाले.  ‘प्रशांत, प्रयोग करू नकोस’ असे तिने मला आजपर्यंत कधीही म्हटले नाही. मला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत परंतु पती-पत्नीच्या नावाने मला व गौरीला मिळालेला हा पहिलाच पुरस्कार आहे त्यामुळे विशेष आनंद आहे. ‘दिलीप प्रभावळकर यांचे व्यक्तिमत्त्व माझ्यासाठी आदर्श व दीपस्तंभासारखे आहे. त्यांच्यातील कलाकाराला सतत प्रश्न पडतात हे कला सादरीकरणासाठी आवश्यक आहे. नाट्य क्षेत्रात वावरताना वातावरण हसते खेळते ठेवणे हे मी दिलीप भैय्यांकडूनच शिकलो.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या उभारणी मागील कहाणी  शशिकांत सुतार यांनी यावेळी सर्वांना सांगितली.  यावेळी स्वागतपर भाषणामध्ये नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेला नाट्य संमेलन घेण्याची संधी मिळावी अशी विनंती सुनील महाजन यांनी केली.

उपाध्यक्ष समीर हंमी यांनी मनोगत व्यक्त केले, तर सत्यजित धांडेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले. पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त ‘धुंदी कळ्यांनो.. धुंदी फुलांनो’  हा सदाबहार गीतांचा कार्यक्रम अजित परब आणि मनिषा निश्चल यांनी सादर केला. त्यामुळे कार्यक्रमातील रंगत आणखी वाढली.

Screenshot 20251127 133505 chrome819318172408390927

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये