नगरसेवकांच्या प्रवेशाबाबत राष्ट्रवादी, भाजपचे दावे

पुणे : भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असा खळबळजनक दावा पुण्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक जण भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. प्रशांत जगताप हे प्रसिद्धीचा स्टंट करत आहेत, असा दावा ‘सिंहासन न्यूज’शी बोलताना केला आहे.

नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली असाही दावा जगताप यांनी केला आहे. तसेच या नगरसेवकांची प्रशांत जगताप यांच्याशी बैठक झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय गोटात खळबळ माजली आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रशांत जगताप यांनी केलेल्या या दाव्याने पक्षांतरांच्या चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसातच पुणे महापालिकेसह इतर मोठ्या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. प्रशांत जगताप यांचा हा दावा खरा ठरल्यास आगामी निवडणुकीत भाजपची चिंता वाढू शकते, मात्र प्रशांत जगताप यांनी याआधीही असा दावा केला आहे, त्यामुळे हा दावा यावेळी तरी खरा ठरणार की गेल्या वेळेसारख्या फक्त चर्चा रंगणार? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. भाजपचे पुण्याचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी हा प्रसिद्धीचा स्टंट असल्याची बोचरी टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक जण भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचा दावा ‘सिंहासन न्यूज’शी बोलताना केला आहे.
पुणे महापालिका निवडणूक पुन्हा जिंकण्यासाठी एकीकडे भाजप जोर लावताना दिसत आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असे अनेक बडे नेते मैदानात उतरले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी पुणे पुन्हा काबीज करण्यासाठी जोर लावत आहे. पुण्यावर अजित पवारांचे विशेष लक्ष असल्याचेही बोलले जाते.
महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या शहराध्यक्षांनी व महापालिका सभागृहनेत्यांनी भाजप 100 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा दावा केलेला आहे.



