पुण्यात आर्थिक फसवणूक करून फरार झालेल्या आरोपीला नवी मुंबई येथून अटक

चंदननगर पोलिसांची कामगिरी
पुणे– पोल्ट्री व्यवसायासाठी रक्कम तसेच सोन्याचे दागिने घेऊन ते परस्पर गहाण ठेवून दोन वर्ष फरार झालेल्या चंदननगर पोलिसांनी शिताफीने अटक केली. संदीप भीमराव भोसले (वय 38, रा. लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) यांच्या फिर्यादीवरून आरोपी दत्तात्रय बबन तावरे ( वय 37) याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने अशा प्रकारे आणखी तीन व्यक्तींची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची आरोपी दत्तात्रय तावरे याच्यासोबत तोंड ओळख होती. पोल्ट्री व्यवसायासाठी आरोपीने त्यांच्याकडून 50 हजार रुपये घेतले. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या पत्नीचा साडेतीन तोळ्यांचा गंठण कार्यक्रमासाठी मागितला. तो परत न करता 16 फेब्रुवारी 2023 रोजी मणिपूरम गोल्ड, चंदन नगर शाखा येथे गहाण ठेवून एक लाख 29 हजार पाचशे रुपयांचे सोने तारण कर्ज घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी चंदन नगर पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आरोपीने वेळोवेळी वास्तव्याचे पत्ते बदलून मोबाईल क्रमांक व बँक खाते वापरणे देखील बंद केलेले होते. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीनुसार तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश लामखेडे पोलीस हवालदार किरण घुटे यांनी सध्या आरोपी हा सानपाडा, नवी मुंबई येथे असल्याचे निष्पन्न केले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश लामखेडे व पोलीस अंमलदार विक्रम गायकवाड यांनी दि. 14 मे 2026 नवी मुंबई सानपाडा येथील दाट लोकवस्तीच्या ठिकाणी जाऊन अत्यंत शिताफीने आरोपीच्या घराचा माग काढून ताब्यात घेतले. अटक आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 17 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
अधिक तपासात आरोपीने अशा प्रकारे आणखी तीन व्यक्तींची देखील फसवणूक केल्याचे निष्पन्न झालेले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ सात चे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त नूतन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश लामखेडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस हवालदार किरण घुटे, पोलीस अंमलदार विक्रम गायकवाड यांनी ही कामगिरी केली आहे.



