
पुणे : कोथरूडमधील उद्योगपती लक्ष्मण शिंदे (वय. 55) यांना कंपनीच्या कामासाठी मेल करून पाटण्यात बोलून घेत त्यांची हत्या करण्यात आली आहे. कंपनीचे काही टूल्स आणि मशीनरी स्वस्त भावात विकत देतो असा आरोपींकडून उद्योगपतीला मेल आला होता.
स्वस्तात मशिनरी मिळेल यासाठी उद्योगपती बिहारला गेले होते. मात्र त्यांच्याशी संपर्क तुटल्याने अखेर कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबाकडून देण्यात आली होती. काल पाटण्यात त्यांचा मृतदेह सापडला.
या प्रकरणी पोलिसांनी एका युवतीसह तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी अपहरण करून त्यांचा खून केल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी आरोपींकडून एक काळी स्कॉर्पिओ, चार मोबाईल फोन जप्त केले आहेत. शिंदे यांचे त्यांची पत्नी रत्नप्रभा यांच्याशी 11 एप्रिल रोजी सायंकाळी शेवटचे बोलणे झाले होते. त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला होता. आरोपी सराईत असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिंदे यांच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पाटणा आणि जहानाबाद पोलिसांनी संयुक्तपणे तपास सुरू केला. शिंदे यांचे मेहुणे विशाल लवाजी लोखंडे यांनी पाटणा आणि पुण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलीसांना संशय आहे की, शिंदे यांचे अपहरण करणारी टोळी लोकांचे अपहरण करायची आणि त्यांच्या खात्यातून पैसे काढून त्यांना सोडून द्यायची, परंतु या प्रकरणात त्यांनी खून केला. पोलीस आता शिंदे यांना का मारले हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.



