पुणे महापालिकेला आली जाग ; कोथरूड चांदणी चौकातील अग्निशमन केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली..

पुणे अर्बन सेलच्या मागणीनंतर आयुक्तांचे निर्देश
कोथरूड : कोथरूडमधील चांदणी चौकात पुणे शहरातील सर्वात मोठे अग्निशमन केंद्र बांधून तयार आहे, केवळ पुणे महापालिकेतील तांत्रिक गोष्टींमुळे ते सेवेत उपलब्ध करण्यात आलेले नाही. मोठा निधी खर्च करून हे उभा केलेले अग्निशमन केंद्र सध्या धूळ खात पडून असून पुणे अर्बन सेलने pune urban cell यामागचे सत्य उघड करत संबधित अग्निशमन केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.

कोथरूडमधील चांदणी चौक, सर्व्हे नं. ७७/१ या ठिकाणी पुणे मनपाच्या वतीने पश्चिम पुणे शहरातील सर्वात मोठे अग्निशमन केंद्र बांधण्यात आले असून या ठिकाणी ५ अग्निशमन वाहने उपलब्ध असणार आहेत. शहरातील संपूर्ण कोथरूड, बावधान, पाषाण, बालेवाडी, सुस, भुगांव, म्हाळुंगे आणि वारजे महामार्ग येथील अनेक भाग या केंद्राखाली समाविष्ट होत आहे. सदर अग्निशमन केंद्र तयार आहे मात्र ते सुरू करण्यास विलंब केला जात असल्याचे पुणे अर्बन सेलचे शहराध्यक्ष स्वप्नील दुधाने यांनी सांगितले.



दुधाने म्हणाले, दि. २२ फेब्रुवारी २०१९ रोजी पुणे बांधकाम विभाग – मनपाकडून अग्निशमन केंद्राला परवानगी प्राप्त झाली असता भवन विभाग, मनपाकडून तब्बल ५६ गुंठे जागेत या अग्निशमन केंद्राच्या आरक्षित जागेवर कामास सुरवात केली. आज या केंद्राचे काम पूर्णत्वास जाऊनही तांत्रिक गोष्टींमुळे ते सेवेत उपलब्ध करण्यात आलेले नाही. याबाबत खडकवासला विधानसभा अर्बन सेलचे अध्यक्ष मीनल ताई धनवटे आणि कोथरूड अर्बन सेलचे अध्यक्ष सचिन यादव यांनी पाठपुरावा केला असता अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला. मनपाच्या मालमत्ता विभागाने सदर जागा ताब्यात घेऊन भवन विभागाने सहा वर्षांत काम पूर्ण केले आहे. परंतु काम पूर्ण झाल्यानंतर मनपाच्या बांधकाम विभागाकडून अंतिम भोगवटापत्र घेणे आवश्यक असून तसेच ते अग्निशमन विभागाला हस्तांतरीत न केल्याने पुढ़ील अग्निशमन केंद्र सुरू करण्याचे काम स्थगित झाले असल्याची बाब पुणे अर्बन सेलने पुढे आणली आहे.



पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले तसेच भवन विभागाचे मुख्य अधिकारी युवराज देशमुख यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुणे अर्बन सेलच्या पदाधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली. यावेळी सदर प्रश्नाचे लवकरात लवकर निवारण करण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली. आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी संबंधित बांधकाम विभागाला अंतिम भोगवटापत्र देण्याबाबत लगेच फोनवर सूचना दिल्या आणि लवकरात लवकर केंद्र सुरू करत नागरिकांना सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी पुणे अर्बन सेलचे शहराध्यक्ष स्वप्नील दुधाने, अर्बन सेलच्या खडकवासला अध्यक्ष मीनल धनवटे, अर्बन सेलचे कोथरूड अध्यक्ष सचिन यादव, कोथरूड महिला अध्यक्षा ज्योती सूर्यवंशी, अर्बन सेलचे सदस्य गणेश ठोंबरे आणि विशाल शेडगे उपस्थित होते.
चांदणी चौकातील या अग्निशमन केंद्रामुळे शहरातील मोठा परिसर सुरक्षित बनणार असून नागरिकांना अग्निशमन सुविधा उपलब्ध होणार आहे. सदर घटनेत त्वरित उपाययोजना केल्याबद्दल आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांचे मनःपूर्वक धन्यवाद! पुणे अर्बन सेलच्या माध्यमातून घेतलेली ही भूमिका नागरिकांच्या कल्याणासाठी असून भविष्यात यामुळे नागरिकांना सुरक्षितता प्राप्त होणार आहे.
स्वप्नील दुधाने
शहराध्यक्ष पुणे अर्बन सेल









