पुणे : इंदापूर मार्गे पंढरपूर बससेवा सुरू

पंढरपूर : राज्य परिवहन महामंडळामार्फत इंदापूर मार्गे पंढरपूर- पुणे(स्वारगेट) बसगाड्या सुरू केल्याचे पंढरपूर आगार प्रमुख मोहन वाकळे यांनी कळविले असल्याची माहिती अ. भा ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली आहे.
मोठ्या संख्येने पंढरपूर- पुणे या बसेस फलटण मार्गे धावतात. अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरू असल्याने प्रवासासाठी विलंब होत होता. त्यामुळे प्रवासी संख्येत घट होत होती. पहाटेपासून अनेक खासगी बसेस इंदापूर मार्गे पुणे अशा धावत आहेत. त्यास प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद पाहता
राज्य परिवहन महामंडळानेही बसेस इंदापूर मार्गे राष्ट्रीय महामार्गावरुन पुण्यासाठी सोडाव्यात, अशी मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती.
त्याप्रमाणे विभाग नियंत्रक विनोद भालेराव यांनी मागणीची दखल घेऊन पंढरपूर येथून पहाटे ५-४५ पासून दुपारी ३ वाजेपर्यत १२ बसेस व परतीच्या प्रवासासाठी स्वारगेट येथून पहाटे ५ पासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत १२ बसेस सुरू झालेल्या आहेत. या बसेस चारच थांबे घेऊन पाच तासामध्ये हा प्रवास पूर्ण करणार असून यामध्ये प्रवाशांना सर्व प्रकारच्या सवलती मिळणार आहेत. तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी या सुरक्षित सेवेला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते, सदस्य सुभाष सरदेशमुख, जिल्हा संघटक दीपक इरकल, सचिव सुहास निकते, अण्णा ऐतवाडकर, तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये, संघटक महेश भोसले, उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे, सचिव प्रा. धनंजय पंधे यांनी केले आहे.
पंढरपूरहून
पहाटे ५-४५, ७-१५, ८-१५, ९-००, ९-१५, १०-००, १०१५,११-००, १२-१५, १३-००, १३-१५, १५-००
स्वारगेटहून
पहाटे ५-००, ५-३०
६-००, ८-००, ११-४५, १२-४५, १३-४५, १६-००, १६-१५, १७-००, १७-३०, १८-००