Baramati Loksabha: सुनेत्रा वहिनींना खडकवासला विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्य मिळवून देणार – दीपक मानकर

पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना खडकवासला विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. कार्यकर्त्यांनी हि निवडणूक हातात घेतली असल्याने सुनेत्रा वहिनींचा विजय निश्चित आहे.असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी सांगितले.
देशातील लक्षवेधी ठरणाऱ्या लढतीपैकी एक असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या मध्ये लढत होत आहे. सुनेत्रा पवार यांनी महायुती कडून आणि सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडी कडून उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. आता महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचारास सुरूवात झाली आहे.
मानकर म्हणाले, खडकवासला मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, आरपीआय व घटक पक्षांची मोठी ताकद आहे. याचा निश्चित फायदा आमच्या उमेदवार सुनेत्रा वहिनींना होणार आहे. सुनेत्रा वहिनींना या मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळवून देण्यासाठी आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोरदार प्रचार करत आहेत .
खडकवासला मतदारसंघातील बावधन, भुसारी कॉलनी, वारजे, शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे, वडगांव, धायरी, धनकवडी, आंबेगाव,सिंहगड रस्ता या शहरी भागात तसेच खडकवासला गाव, गोऱ्हे बुद्रूक खानापूर, डोणजे, या ग्रामीण भागात प्रचाराने वेग घेतला आहे. या भागातील मतदार महायुतीच्या पाठीशी ठाम पणे उभे राहणार असल्याने या मतदारसंघातून आमच्या उमेदवार सुनेत्रा वहिनी पवार यांना मोठे मताधिक्य मिळणार आहे.






