वार्धक्य आनंदी करण्यासाठी पुणे विद्यापीठाचे बहि:शाल केंद्र काम करणार: डाॅ हरीश नवले

पुणे : ज्येष्ठ नागरिकांचे वार्धक्य आनंदी करण्यासाठी पुणे विद्यापीठाचे बहि:शाल शिक्षण मंडळ काम करणार असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्षाचे मानद संचालक डॉ. हरीश नवले यांनी सांगितले.
संस्कार मंदिर संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने वारजे येथील श्री पावशा गणपती जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते
कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी संस्कार मंदिर संस्थेचे खजिनदार अविनाश जाधव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्षाचे मानद संचालक डॉ. हरीश नवले, डॉ. विजया दाते, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.राजेंद्र थोरात, उपप्राचार्य डाॅ. देवेंद्र भावे, ज्येष्ठ नागरिक संघाचे दिक्कतवार, संयोजक डॉ. स्वाती जगताप आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन तीन सत्रांमध्ये करण्यात आले होते. पहिल्या सत्रामध्ये डॉ. विजया दाते यांचे ‘त्वचा व अवयव दान’ या विषयावर व्याख्यान झाले. दुसऱ्या सत्रामध्ये गजानन पातुरकर यांनी ‘हास्यविनोदातून समाज प्रबोधन’ करत असताना कविता चारोळ्या वेगवेगळ्या आवाजाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रामध्ये मारुती यादव यांच्या ‘आनंदाची लयलूट’ या एकपात्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.राजेंद्र थोरात यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. स्वाती जगताप, सूत्रसंचालन डॉ. ललिता कानगुडे आणि आभार प्रदर्शन डॉ. संजय गिरी यांनी केले.


