पुणे पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कामांबाबत आवाज उठवा : बाळा कदम

पुणे : घरोघरी संपर्क अभियान सुरू करून या संपर्क अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने वर्ष भरात जे लोकहिताचे निर्णय घेतलेले आहेत ते सर्व निर्णय घरोघरी पोहचवा, जास्तीत जास्त नवीन शिवसैनिकांची सदस्य नोंदणी करा, वर्षभरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करा आणि पुणेकरांच्या हिताच्या आड येणाऱ्या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कामाबाबत आवाज उठण्यासंदर्भात शिवसेनेचे पुणे संपर्कप्रमुख बाळा कदम यांनी आज मार्गदर्शन केले.
आगामी २०२२ च्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर शिवसेनेचे पुणे संपर्कप्रमुख बाळाभाई कदम यांनी पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवकांबरोबर पुणे महानगरपालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीला शिवसेना-गटनेते पृथ्वीराज सुतार, शहरप्रमुख संजय मोरे, बाळा ओसवाल, अविनाश साळवे, विशाल धनवडे, नाना भांगिरे, संजय भोसले, संगीता ठोसर, पल्लवी जावळे, श्वेता चव्हाण, प्राची आल्हाट आदी उपस्थित होते.
कदम यांनी मार्गदर्शन करताना आगामी निवडणूकीच्या दृष्टीने सर्व नगरसेवकांना तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वांनी प्रभागामध्ये जाऊन घरोघरी संपर्क अभियान सुरू करण्यास सांगितले आहे. बैठकीचे प्रस्ताविक शिवसेना-गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केले व आभार संगीता ठोसर यांनी मानले.







