मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून राजयोग प्रतिष्ठानचा आगळावेगळा उपक्रम : बाबा धुमाळ

वारजे : वारजे येथिल राजयोग प्रतिष्ठान व श्रीमंत राजयोग गणेश मित्र मंडळाच्या वतीने राजयोग सोसायटी मधील श्री गणेश मंदिर मध्ये गेल्या चार महिन्यांपासून ह.भ.प. धर्मराज महाराज हांडे यांच्या प्रयत्नातून परिसरातील लहान मुलामुलींसाठी हरिपाठ चे संस्कार वर्ग सुरू करण्यात आले असून या माध्यमातून मुलांवर चांगले संस्कार होत असल्याचे माजी नगरसेवक व शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी सांगितले. Raja Yoga Pratishthan’s unique initiative to inculcate good values in children: Baba Dhumal
रोज सायंकाळी साडे सहा ते साडे आठ या वेळेत वारकरी संप्रदायातील संगीत हरिपाठ सुरू आहेत. यामध्ये मुलांची संख्या जास्त असल्याने मुलांची व मुलींची स्वतंत्र दोन बॅचमध्ये वर्ग सुरू करण्यात आले आहेत. मुलांची शाळा बंद असल्याने मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार घडावेत व या वयापासूनच या मुलांना वारकरी संप्रदाय व भजन, किर्तन, प्रवचन व संतांची माहीती व्हावी या हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे धुमाळ यांनी सांगितले.

गेले तीस पस्तीस वर्षापासून या मंदिरात दर शनिवार, चतुर्थी व प्रत्येक एकादशीला हांडे महाराजांच्या मार्गदर्शनाखाली भजन, किर्तन व प्रवचनाचे कार्यक्रम होत आहेत, याचाच एक भाग म्हणून ही परंपरा यापुढेही अशीच चालु रहावी म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी ह.भ.प धर्मराज महाराज हांडे व राजयोग भजनी मंडळाचे सर्व सदस्य रोज आपला वेळ देत आहेत. या संस्कारातुन मुलांमधुन चांगले गायक, तबला-पखवाज वादक व हार्मोनियम वादक निर्माण व्हावेत असा उद्देश समोर ठेवुन हा उपक्रम राबवित आहोत अशी माहिती धुमाळ यांनी दिली.



