वारजे साहित्यिक कट्ट्यावर डॉ. रामचंद्र देखणे यांच्या आठवणींना उजाळा ; श्रद्धांजली सभेचे आयोजन

वारजे : देवीची आरती करताना त्यांना देवीचे बोलवणे आले ही गोष्ट साधी नाही. असे मरण यायला भाग्य लागते असे म्हणत जेष्ठ साहित्यिक माधवी वैद्य यांनी डॉ रामचंद्र देखणे यांना श्रद्धांजली वाहिली. त्या म्हणाल्या, संचीताला डॉ. देखणे यांनी जास्त महत्व दिले. भारुडावर पी.एच. डी. करून ते थांबले नाहीत तर आपल्या लोककलेला पूनरुजीवन दिले. आज भारुड म्हणजे काय हे पुढील पिढीला समजले पाहिजे म्हणून त्यांनी ही कला जपली आणि कुटुंबातील सगळे लोक यात समाविष्ट करून सादरीकरण करत राहिले.
साहित्यिक, संत व लोक साहित्याचे गाढे अभ्यासक, विचारवंत कीर्तनकार, भारुडकार डॉ. रामचंद्र देखणे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. वारजे साहित्यिक कट्ट्यावर त्यांचे विशेष प्रेम होते. त्यांच्या अनेक आठवणी साहित्यिक कट्ट्याबरोबर जोडलेल्या आहेत. त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी वारजे साहित्यिक कट्याच्या वतीने डॉ. माधवी वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली आणि वि.दा. पिंगळे यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष, माजी नगरसेवक प्रदीप धुमाळ, धर्मराज हांडे महाराज, रामचंद्र देखणे यांचे पुत्र भावार्थ देखणे उपस्थित होते.

न भूतो न भविष्य असे व्यक्तिमहत्व आपणाला मिळाले होते. भारुडाची कला त्यांनी महाराष्ट्रात नाही तर परदेशातही सादर केली होती. पुन्हा अशी व्यक्ती आपणाला कधी मिळेल याची प्रतीक्षा करावी लागणार आहे, असे म्हणत धुमाळ परिवाराच्या वतीने माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली यांनी डॉ. कीर्तनकार रामचंद्र देखणे यांना श्रद्धांजली वाहिली.
प्रदीप धुमाळ म्हणाले, डॉ देखणे हे बेभान होऊन आपली व्यक्तिरेखा ते आपल्या भरुडात सादर करत. असे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आपल्यातून गेले आहे. साहित्यिक कट्ट्यावरील साहित्यिकांना त्यांची आठवण ही येत राहील. अखंड हरिनाम सप्ताहात त्यांचे कीर्तन करता आले नाही याची खंत नेहमी राहील त्यांनी दिलेले विचार आपण तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम आपण केले पाहिजे असेही प्रदीप धुमाळ यावेळी म्हणाले. डॉ रामचंद्र देखणे यांच्या नावाने रामचंद्र देखणे मुक्त वाचनालय असे नाव देणार अशी घोषणा यावेळी धुमाळ यांनी केली
हांडे महाराज म्हणाले, अध्यात्मिक भूक भागवण्याचे काम देखणे यांनी केले. डॉ. देखणे हे शरीराने गेले आहेत, पण महाराष्ट्रात त्यांचे विचार आजरामर आहेत. भारुडातील त्यांचा पोतराजाचा अवतार बघण्यासारखा होता. ते एक उत्तम साहित्यिक, भारुडकार, प्रवचनकार होते. सांप्रदायाचा वसा त्यांनी जपला आपण कशासाठी जन्माला आलो याचे त्यांना भान होते.



वि. दा. पिंगळे म्हणाले माऊलींचे दुसरे रूप हे देखणे सर होते दारिद्र्या पासून त्यांनी संघर्ष केला आहे. असे हे सात्विक व्यक्तिमत्व आपल्यातून गेले यावर विश्वास बसत नाही. त्यांचे शब्द त्यांचे विचार त्यांची पुस्तके समाजाला पुढे नेतील असे काम त्यांनी करून ठेवले आहे. साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदात डॉ. देखणे यांचे हे सुवर्णपान हे येता येता राहिले 3000 पेक्षा लेख, 50 पेक्षा जास्त पुस्तके त्यांनी लिहिली अनेक वर्षाने अशी माणसे जन्माला येतात असे वि. दा. पिंगळे म्हणाले. पुण्यात आल्यानंतर रस्त्यावर ते सुरेख रांगोळी काढत असे ती रांगोळी पाहून लोक पैसे टाकत त्या पैशावर त्यांनी शिक्षण केले असा अनुभव देखणे यांनी सांगितलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.



संतांच्या मांदियाळीत बसणारा आधुनिक कीर्तनकार, संत हे देखणे होते, त्यांचे आनंद वारी नावाने एक सदर वारीच्या त्या १५ दिवसात महाराष्ट्र टाइम्स मध्ये असायचे त्यांच्या सदरातून वारीची अनुभूती येत. अशा त्यांच्या जाण्याने आता या अनुभवाला आपण मुकलो, देखणे सर सर्व सामान्य लोकांसाठी सहज उपलब्ध होत असत. ते संत साहित्याला माणसांशी जोडत. माणसातील माणूस घडवायचे असेल तर नैतिक आणि आदर्श मूल्य मिळाले तर माणूस घडू शकेल असे डॉ. देखणे म्हणत. लिखाणातून, प्रवचनातून माणूस घडला पाहिजे हा वारसा आपण पुढे घेऊन जावू असे ते सांगत. देखणे हे भारुडामध्ये सहकुटुंब सहभागी होत. त्यांनी जी संस्कृती जपली ती पुढे नेली पाहिजे देखणे यांच्या सारखी व्यक्ती ही वैयक्तिक नसते तर ही व्यक्ती सार्वजनिक असते अशा भावना साहित्यिक कट्ट्यातील सदस्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
यावेळी साहित्यिक डि के जोशी, उदय कुलकर्णी, सुरेश जाधव, नंदकिशोर बोधाई, महादेव गायकवाड उपस्थित होते. गोपाळ कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. कै.गंगाबाई धुमाळ बालोद्यान व विरंगुळा केंद्र वारजे या ठिकाणी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.






