आरोग्य

गुजरातमधील ‘एक्सई’बाधित रुग्ण मूळचा मुंबईतील सांताक्रूझचा

मुंबई : गुजरातमध्ये आढळलेल्या एक्सई या करोनाच्या उपप्रकाराने बाधित रुग्ण मूळचा मुंबईचा असून सध्या याची प्रकृती स्थिर असल्याचे मुंबई पालिका प्रशासनाने सांगितले आहे. सांताक्रूझ येथे राहणारा 67 वर्षीय व्यक्ती त्याच्या पत्नीसह 11 मार्चला गुजरातमधील बडोद्याला गेला होता. 

बडोद्याला ज्या हॉटेलमध्ये तो थांबला होता, तेथे त्याची ब्रिटनच्या दोन व्यक्तीसोबत बैठक होती. ब्रिटनचे हे नागरिक 6 मार्चला ब्रिटनहून आले होते. बैठकीनंतर 11 मार्चला या व्यक्तीला ताप आला. 12 मार्चला तपासणी केली असता करोनाबाधित असल्याचे आढळले. त्यानंतर हा रुग्ण पत्नीसह खासगी टॅक्सी करून 13 मार्चला मुंबईच्या घरी परतला. मुंबईच्या घरी पुढील सात दिवस म्हणजे 20 मार्चपर्यत रुग्ण विलगीकरणात होता. 11 मार्चनंतर त्याला कोणतीही लक्षणे आढळलेली नाही. त्याच्या संपर्कात आलेली त्याची पत्नी आणि मोलकरीण दोघींच्याही चाचण्या त्यावेळी केल्या गेल्या. दोन्ही करोनाबाधित नसल्याचे आढळले, असे मुंबई पालिका प्रशासनाने सांगितले आहे.

गुजरात येथील प्रयोगशाळेमध्ये त्याच्या तपासणीचे नमुने जनुकीय चाचण्यांसाठी पाठविले होते. प्राथमिक चाचणीमध्ये त्याला एक्सईची बाधा झाल्याचे आढळले. त्यामुळे हे नमुने कोलकत्त्यातील जनुकीय चाचणी करणाऱ्या संस्थेला फेरतपासणीसाठी पाठविले होते. याचा अहवाल शुक्रवारी आला असून याला एक्सईची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे, असे गुजरातच्या आरोग्य विभागाने जाहीर केले आहे. सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुंबई पालिका प्रशासनाने दिली आहे.

Fb img 1648963058213
Img 20220409 wa00076833851649454856397

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये