क्रीडा

पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी

पुणे : महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरूद्ध मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांच्यात आज अटीतटीची लढत झाली. यामध्ये पृथ्वीराज पाटील याने विशाल बनकर याचा पराभव करत, 2022 ची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. पृथ्वीराजने चार गुणांची पिछाडी भरून काढत पाच विरुद्ध चार असा विजय मिळवला.

या अगोदर पृथ्वीराजने पुणे शहरच्या हर्षद कोकाटेवर एकतर्फी विजयाची नोंद केली होती, तर शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या लढतीत विशालने वाशिमच्या सिकंदर शेखवर तेरा विरुद्ध दहा गुण फरकाने मात केली होती. “काहीही झाले तरी महाराष्ट्र केसरीची गदा जिंकायचीच असा पण मी केला होता. आपण ही कुस्ती जिंकणारचं असा सुरूवातीपासूनच मला विश्वास होता. त्यासाठी मी पूर्वीपासून तयारीही केली होती. सुरुवातीला प्रतिस्पर्ध्याचा अंदाज घेऊन शेवटी आक्रमक व्हायचे असे धोरण मी ठरवले होते. कुस्ती करत असताना मी जे ठरवले होते त्याप्रमाणे कुस्ती होत गेली आणि अंतिम क्षणी मी केलेली खेळी यशस्वी झाली व गुणाधिक्यावर मी जिंकलो.” अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरल्यानंतर पृथ्वीराज पाटील याने दिली.

पृथ्वीराज पाटील, मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामधील देवठाणेचा आहे. त्याने संजीवनीदेवी गायकवाड महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण, मोतीबाग तालमीतून कुस्तीचा श्रीगणेशा, वस्ताद महान भारत केसरी दादू चौगुले, पैलवान संग्राम पाटील व धनाजी पाटील यांच्याकडून कुस्तीचे धडे घेतले. पृथ्वीराज पाटील 95 किलो वजनी गटात ज्युनिअर वर्ल्ड स्पर्धेत कास्य पदकाचा मानकरी ठरला. पृथ्वीराज पाटील आर्मीत हवालदार पदावर कार्यरत आहे.

विशाल बनकर, पूर्व मुंबईचे प्रतिनिधित्व करतोय. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील मांडवे गावात 1987 रोजी विशाल बनकरचा जन्म झाला. विशाल महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर यांचा पुतण्या आहे. गेल्या दहा वर्षांपासून कुस्ती क्षेत्रात आहे, सुरुवातीला भारत भोसले खवसपूर तालमीत ५ वर्ष प्रशिक्षण, मागील पाच वर्षांपासून कोल्हापुरातील श्री शाहू विजयी गंगावेस तालमीत प्रशिक्षण घेतोय. 97 किलो वजनी गटात 2018 व 2019 च्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विशाल बनकरने सुवर्णपदक पटकावले होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये