हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे काम सात दिवसात सुरु न झाल्यास तीव्र आंदोलन : खासदार गिरीश बापट

पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे काम सात दिवसात चालू करण्यासाठी आज खासदार गिरीश बापट यांनी पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ सुहास दिवसे यांची भेट घेतली.
बापट म्हणाले, हिंजवडी येथील आयटी पार्क, पुणे व पिंपरी चिंचवड शहराला जोडणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर प्रस्तावित मेट्रो मार्गाचे काम गेले अनेक वर्षे प्रलंबित असल्याने हा मार्ग नियोजित वेळेत पूर्ण होणे शक्य नाही. प्राधिकरणाकडून यावर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात आहे. सदर मेट्रो नियोजित वेळेत पूर्ण न झाल्यास भविष्यकाळात त्यावर अतिरिक्त खर्च करावा लागेल ही शक्यता नाकारता येत नाही. याचा नकळत आर्थिक भार हा पुणेकर जनतेला व शासनाला सोसावा लागणार आहे, ही बाब नक्कीच गंभीर आहे. सदर मार्ग सुरु होण्यास विलंब होत असल्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीचा प्रश्न नित्याचा झालेला आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक त्रासाचा सामना करावा लागत आहे.

सदरचा मार्ग हा पुणे, पिंपरी-चिंचवड मधील नागरिक व आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या असंख्य कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडीच्या त्रासातून सुटका देणारा असल्यामुळे सदर मार्गावर ज्या ९८ % जागा ताब्यात आलेल्या आहेत, त्या ठिकाणी तातडीने काम सुरू करावे, तसेच ज्या उर्वरित शासनाच्या जागा ताब्यात आलेल्या नाही, त्या ताब्यात घेणेबाबत प्रशासनाने लक्ष देवुन कार्यवाही करावी. जेणे करुन सदरचा प्रस्तावित मेट्रो मार्ग नियोजित वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल. येत्या सात दिवसात काम सुरु न झाल्यास नजीकच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला आंदोलन करावे लागेल हे भुमिका खासदार गिरीश बापट यांनी स्पष्ट केली . तसेच मेट्रोच्या प्रलंबित प्रश्नांवरही चर्चा झाली.



यावेळी आमदार सिध्दार्थ शिरोळे, उपमहापौर सुनिता वाडेकर, नगरसेवक प्रकाश ढोरे, आदित्य माळवे, अमोल बालवडकर,नगररसेविका ज्योती कळमकर, निलिमा खाडे, स्वप्नाली सायकर,शहर भा ज पा चे प्रचार प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापूरकर, कोथरूड भाजपा मंडल अध्यक्ष पुनीत जोशी आदी उपस्थित होते.






