प्रेषितप्रकरणी अरब देशांत तीव्र पडसाद, भाजपची अखेर पदाधिकाऱ्यांवर कारवाई

नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांनी अवमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी अरब देशांमध्ये तीव्र पडसाद उमटले असून जगभरात निषेधाचा सूर उमटला आहे. त्यामुळे या दोन्ही पदाधिकाऱ्यांवर अखेर भाजपला कारवाई करावी लागली आहे. या प्रकरणी इराण, कतार आणि कुवेत या देशांनी तेथील भारतीय दूतावासांना स्पष्टीकरणासाठी पाचारण केले आहे. अनेक देशांमध्ये ट्वीटरवर ‘‘भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाका’’, असा हॅशटॅग चालवण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य करण्यात येत आहे.
एका वृत्तवाहिनीवर ज्ञानवापी प्रकरणावरील वादचर्चेत भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. दिल्ली भाजपचे माध्यम प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांनीही प्रेषितांबद्दल अवमानकारक टिप्पणी केली. या घटनेचे जगभरात विशेषतः अरब देशांमध्ये पडसाद उमटले आहेत. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या भाजपने जिंदाल यांची हकालपट्टी केली तर शर्मा यांना केवळ निलंबित केले आहे.
या प्रकरणी इराण, कतार आणि कुवेत या देशांनी तेथील भारतीय दूतावासांना स्पष्टीकरणासाठी पाचारण केल़े अरब देशांमध्ये ट्वीटरवर ‘‘भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाका’’, असा हॅशटॅग चालवण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य करण्यात येत आहे. कतारने तेथील भारतीय राजदूतांना पाचारण करून नुपूर शर्मा यांच्या टिप्पणीबद्दल एका निवेदनाद्वारे तीव्र निषेध नोंदवला. कतारच्या परराष्ट् विभागाने रविवारी सांगितले की, भारतात भाजपनेत्यांकडून प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल विचारणा करण्यासाठी आम्ही भारताचे राजदूत दीपक मित्तल यांना पाचारण केले होते. या पूर्णत: अस्वीकारार्ह, निषेधार्ह विधानाबाबत आम्ही त्यांना निवेदन दिले आहे. धार्मिक व्यक्तीमत्त्वांबाबत भारतातील काही व्यक्ती अवमानकारक वक्तव्ये करीत असल्याबद्दल त्यांच्याकडे आम्ही चिंता व्यक्त केली आहे. यावर भारतीय राजदूतांनी स्पष्ट केले की, ही विधाने कोणत्याही प्रकारे भारत सरकारचे मत नाही, तर ती काही दुय्यम घटकांचे मत आहे. भारतीय परंपरेनुसार भारत सरकार सर्वच धर्मपंथांचा सन्मान करते. अशा विधानांबाबत संबंधितांवर कारवाईचे आश्वासनही त्यांनी दिले. भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू सध्या कतारच्या दौऱ्यावर आहेत.

सर्व धर्माबद्दल पक्षाला आदर असून, कोणत्याही पंथाचा किंवा धर्माचा अवमान करणे पक्षाला मान्य नाही, असे स्पष्टीकरण भाजपने दिले आहे.






