एसटीत हाफ तिकीटसाठी महिलेचा ड्रामा : फडणवीसांची घोषणा लक्षात ठेवत वाहकाशी हुज्जत, मारहाण

लातूर : शिंदे फडणवीस सरकारने अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेचा एका एसटी वाहकाला चांगलाच फटका बसला आहे. महिलेला आता अर्ध तिकीट हाय म्हणत महिलेने एसटी वाहकाशी हुज्जत घातली. तर, तिच्या मुलाने वाहकाला थेट मारहाणच केली. याप्रकरणी जखमी वाहकाच्या तक्रारीवरून महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिंदे सरकारने सादर केलेल्या पहिल्या अर्थसंकल्पात महिलांना एसटी प्रवासादरम्यान तिकीटाची ५० टक्के रक्कम द्यावी लागेल अशी घोषणा करण्यात आली होती. त्याची जाहिरातबाजी देखील मोठ्या प्रमाणात झाली. मात्र, घोषणा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी होण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणांना जीआर मिळणे आवश्यक असते. परंतु, प्रक्रियेची माहिती नसलेल्या पण सरकारने जाहीर केलेल्या घोषणेची माहिती मिळाल्याने एका महिलेनं एस टी कंडक्टर (वाहक) सोबत सध्या तिकिटासाठी बसमध्येच हुज्जत घातली. या महिलेचे नाव सविता पोपट माने असे आहे.

गोविंद शिवाजी मुंडे हे एसटी वाहक दत्तापूर ते लातूर ही बस घेऊन लातूरकडे येत असताना कामखेडा येथून सविता पोपट माने ही महिला एसटी बस मध्ये चढली. वाहक गोविंद मुंडे यांनी तिकिटाची विचारणा केली असता सविता यांनी तिकिटाचे अर्धे पैसेच देऊ केले. परंतु, गोविंद मुंडे यांनी तिकिटाचे पूर्ण पैसे मागितले असता सविता यांनी वाहक गोविंद मुंडे यांच्याशी हुज्जत घातली. “महिलांना हाफ तिकीट झाले आहे, नेमानं तिकीट घ्यायचं, जास्त आगाव बोलायचं नाही, चला कायदा दाखवते तुम्हाला, आता कोणत्याही कार्डाची गरज नाही, महिलांना हाफ तिकीट झालंय” असं म्हणत सविता माने या वाहक गोविंद मुंडे यांच्याशी वाद घालू लागल्या.
वाहक गोविंद मुंडे यांच्यासह इतर प्रवाशांनी सविता माने यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण सविता माने काही ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हत्या. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झालाय. हा वाद वाढल्याने आणि अर्ध्या तिकिटावरच प्रवास करायचा या जिद्दीने सविता अखेर कामखेडा येथेच बसमधून उतरल्या. त्यानंतर बस लातूरच्या दिशेने निघाली. दरम्यान, सविता माने यांनी घडला प्रकार त्यांच्या मुलाला गोटु माने याला सांगितला.
बस लातूर येथील फुलाबाई बनसोडे हॉस्पिटलच्या जवळ आली असता या बसच्या पाठीमागून गोटू माने आणि त्यासोबत एका अनोळखी व्यक्तीने त्यांची दुचाकी बसच्या समोर आडवी लावली. त्यामुळे बस चालकाने बस थांबवली. गोटू माने आणि त्याच्या सोबतच्या अन्य एकाने बसमधे चढून वाहक गोविंद मुंडे यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. शिवाय रेणापूरकडे दिसलास तर तुला जिवे मारू अशी धमकीही दिली.
याप्रकरणी जखमी वाहक गोविंद मुंडे यांनी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात सविता पोपट माने, गोटू पोपट माने आणि अन्य एका अनोळखी व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली त्यांच्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी आणि शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी, तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी तिघांविरोधात विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



