शाळा सुरू झाल्या.. मुलांची अधिक काळजी घेणे आपली जबाबदारी – उध्दव ठाकरे

मुंबई, दि. 4 : आजपासून सुरु झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत अशा निर्धाराने शिक्षण सुरू ठेवू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला व त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते. शाळा सुरु करुन आपण मुलांच्या विकासाचे, प्रगतीचे दार मुलांसाठी उघडतो आहोत. मात्र मुलांची अधिक काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
कोरोनासाठीचे निर्बंध शिथील करून राज्यातील शाळांची प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड, अपर मुख्य सचिव श्रीमती वंदना कृष्णा, या प्रत्यक्ष तर शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, संचालक राहुल त्रिवेदी, टास्क फोर्स सदस्य डॉ.सुहास प्रभू, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (MSCERT) चे विकास गरड ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ या बोधचिन्हाचे अनावरणही करण्यात आले.

मुख्यमंत्री म्हणाले, आज जेव्हा सर्व विद्यार्थी पुन्हा एकदा शाळेत जाणार आहेत. तेव्हा मला माझे शाळेचे दिवस आठवत आहेत. सुटीनंतर शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भरलेला असायचा. मित्रांना भेटण्याची उत्सुकता असायची, नवीन वह्या-पुस्तके, गणवेश मिळायचे. आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा सर्वात आव्हानात्मक काळ सुरू आहे. मुलं ही फुलासारखी नाजूक असतात, त्यांचे वय घडण्याचे असते या विषयावर टास्क फोर्सशी नियमित चर्चा होत असते.
शाळा सुरु करताना वर्ग खोल्यांची दारे बंद नसावीत, हवा खेळती असावी, शाळेचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. निर्जंतुकीकरण करताना मुलांच्या आरोग्याला अपाय होणार नाही याचीदेखील काळजी घ्यावी असेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.
आपल्या पाल्याची जबाबदारी आपण स्वतः घ्या. पावसाळ्यामुळे तसेच इतर अनेक साथीचे रोग येत आहेत. त्यामुळे प्रकृतीकडे लक्ष ठेवावे. स्वःताला बरे वाटत नसेल तर शंका आल्यास लगेच कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन उध्दव ठाकरे यांनी केले.