राष्ट्रीय

राजकारणी लोकांपेक्षा सामान्य माणूस शहाणा : शरद पवार

पुणे : आम्हा राजकारणी लोकांपेक्षा सामान्य माणूस शहाणा आहे. लोक आमचं चुकलं तर अक्कल शिकवतात, असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळाचं उदाहरण दिलं.

शरद पवार म्हणाले, “भारताची जमेची बाजू म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना. आपण स्वतंत्र झाल्यानंतर १९५० मध्ये आपल्याकडे घटना आली. या घटनेने देशाला एकसंघ ठेवलं ही गोष्ट आपल्याला मान्यच करावी लागेल. दुसरीकडे श्रीलंकेत पाहिलं तर त्या ठिकाणच्या राज्यकर्त्यांच्या हातातील सत्ता गेल्यासारखी आहे. लोक रस्त्यावर आहेत. श्रीलंकेप्रमाणेच पाकिस्तानमध्ये स्थिती आहे. तेथेही पंतप्रधानांना काढून टाकण्यात आलं. भुट्टो जेव्हा पंतप्रधान होत्या तेव्हा त्यांची हत्या झाली. अनेकांची उदाहरणं या ठिकाणी सांगता येतील.”

“अनेक देशांमध्ये संविधानाची भक्कम चौकट नसल्यामुळे त्या ठिकाणी लोकशाही सतत संकटात जाते. आपल्याकडे लोकशाही संकटात जात नाही त्याचं महत्त्वाचं कारण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना हे आहे,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

शरद पवार पुढे म्हणाले, “दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या देशात आणखी एक गोष्ट चांगली आहे. भारतात आम्हा राजकारणी लोकांपेक्षा सामान्य माणूस शहाणा आहे. तो शहाणपणाने निकाल देतो. त्याचं उदाहरण म्हणजे इंदिरा गांधी यांनी आणीबाणीसारखा निर्णय घेतला तेव्हा लोकशाहीवर संकट आल्याचं लोकांना वाटलं. लोकांनी इंदिरा गांधी यांचाही पराभव केला. राज्य हातातून काढून घेतलं. त्यावेळी मोरारजी भाई, अटलबिहारी वाजपेयी या सगळ्यांच्या हातात राज्य दिलं.”

“यानंतर २ वर्षात नव्या लोकांना राज्य चालवता येत नाही हे दिसलं आणि ज्या लोकांनी इंदिरा गांधींच्या हातातून सत्ता काढून घेतली त्याच लोकांनी पुन्हा इंदिरा गांधी यांच्या हातात पुन्हा राज्य दिलं. याचं कारण या देशाचे लोक शहाणे आहेत. आमचं चुकलं तर अक्कल शिकवतात आणि दुरुस्त करायला पुढे काही आलं तर त्याला संधी देतात,” असंही शरद पवार यांनी नमूद केलं.

शरद पवार यांनी भारतातील आर्थिक संकटावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “देशात प्रचंड आर्थिक संकट आहेतच. नोटबंदीने काय झालं? नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था केवळ संकटात आली. त्याने अशाप्रकारचे अनेक निर्णय घेतले. त्या निर्णयांमध्ये लोकांना सहभागी करायचं असतं ते केलेलं नाही. करोना काळात यांनी एकदा सांगितलं सगळ्यांनी थाळी वाजवा. लोकांनी थाळ्या वाजवल्या कारण त्यांच्यावर संकट होतं. मात्र, त्याला ते उत्तर नव्हतं. अशा अनेक गोष्टी या कालखंडात झाल्यात, हे दुर्दैव आहे.”

Img 20220425 wa00102978251768482543832

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये