राष्ट्रीय

दिल्लीत मोठा गोंधळ! पोलिसांनी उपोषणस्थळावरून सोनम वांगचूक यांना रुग्णालयात हलवले..

अभिजीत दिपके यांचे गंभीर आरोप

नवी दिल्ली : गेल्या 20 दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे आमरण उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. मात्र, या कारवाईदरम्यान आंदोलनस्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला.

उपोषणस्थळी पोलिसांनी पोहोचताच आंदोलकांनी विरोध दर्शवला. त्यानंतर पोलिसांनी वांगचूक यांना तातडीने रुग्णालयात हलवले आणि परिसरातील आंदोलकांनाही हटवण्याची कारवाई केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

वांगचूक यांच्यासोबत आंदोलनात सक्रिय असलेले कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी स्वतःला मारहाण करून ताब्यात घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. उपोषणाच्या सुरुवातीपासूनच दीपके हे वांगचूक यांच्या आंदोलनात सक्रिय सहभागी होते.

Img 20260222 wa00063491038201882637992



नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सोनम वांगचूक 28 जूनपासून आमरण उपोषण करत होते. दीर्घकाळ अन्नत्याग केल्यामुळे त्यांचे सुमारे 20 किलो वजन घटल्याचे सांगितले जात असून त्याचा त्यांच्या स्नायूंवरही परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात उपचार सुरू असून ते शुद्धीवर आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

दरम्यान, वांगचूक यांनी शुक्रवारी रात्री प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये 20 जुलै रोजी “चलो संसद” आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर सरकारने उत्तरदायित्व स्वीकारावे आणि शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांवर कठोर कारवाई करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.

या आंदोलनाला देशभरातील विविध विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी आणि जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सातत्याने होत आहे.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी सांगितले की, दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि सरकारी डॉक्टरांच्या वैद्यकीय अहवालाच्या आधारे वांगचूक यांच्या प्रकृतीची नियमित तपासणी करण्यात येत होती. त्यांची तब्येत अधिक खालावत असल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये