धर्मेंद्र प्रधानांनी अखेर मौन सोडलं ; NEET पेपरफुटी आंदोलनाचा दबाव अन् राजीनामा..काय म्हणाले..

धर्मेंद्र प्रधान यांच्या वक्तव्याने पुन्हा राजकारण पेटणार ?
NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावर देशभरात झालेल्या तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या पार्श्वभूमीवर राजीनाम्यानंतर प्रथमच धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या निर्णयावर भाष्य केले आहे.

भुवनेश्वर येथील जीएम विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलताना धर्मेंद्र प्रधान यांनी युवा पिढीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला. “देश आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता मी राजीनामा दिला. माझ्यासाठी पद महत्त्वाचे नाही,” असे प्रधान यांनी म्हटले.



ते पुढे म्हणाले की, या युवा पिढीच्या स्वतःच्या आकांक्षा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित कोणताही प्रश्न गांभीर्याने घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावर देशभरात मोठे आंदोलन उभे राहिले होते. विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सरकारवरही त्यांच्या राजीनाम्यासाठी मोठा दबाव निर्माण झाला होता. आंदोलकांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे प्रयत्न झाले; मात्र, “धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत माघार घेणार नाही,” अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती.
या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर अखेर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा निर्णय झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाचे नेते म्हणून धर्मेंद्र प्रधान यांची ओळख होती. ओडिशातील प्रभावी ओबीसी चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ते केंद्रातील सत्ताकारणातील महत्त्वाच्या भूमिकेत होते.
राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच केलेल्या या वक्तव्यामुळे NEET पेपरफुटी, विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि त्यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता आहे.



