एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी शरद पवार वर्षा बंगल्यावर दाखल; चर्चांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परदेशात असताना शरद पवार वर्षावर दाखल झाले आहेत.
मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. सुप्रीम कोर्टाने राज्यातील सत्ता संघर्षाबाबत दिलेल्या निकालानंतर पडद्यामागून हालचाली सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच आज शरद पवार हे वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
तर, शरद पवार यांनी राज्यातील काही महत्त्वाच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासह इतर प्रश्नांसाठी भेट घेतली असावी असे म्हटले जात आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार यांची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे.







