शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून धाड

मुंबई : शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून धाड टाकण्यात आली आहे. जाधव हे मुंबई मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष आणि भायखळा मतदारसंघातून आमदार यामिनी जाधव यांचे पती आहेत.

पहाटेच प्राप्तिकर विभागाचं पथक यशवंत जाधव यांच्या माझगावमधील निवासस्थानी दाखल झालं. मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष असल्याने आर्थिक निर्णयांमध्ये यशवंत जाधव यांचा सहभाग असतो. पालिकेच्या कंत्राट आणि अन्य व्यवहारांमध्येही स्थायी समितीची महत्वाची भूमिका असते. याआधी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर मनी लॉण्ड्रिंगचा आरोप केला होता. यशवंत जाधव शिवसेनेचे महत्वाचे नेते मानले जातात.



“मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी 15 कोटी रुपये रोख स्वरुपात मनी लॉण्ड्रिंग करणाऱ्या उदय शंकर महावारला दिले आहेत. हे पैसे प्रधान डिलर प्रा. लिमिटेडच्या खात्यात जमा करण्यात आले. या कंपनीचा एक रुपयांचा शेअर आणखी पाच कंपन्यांनी पाचशे रुपये दराने घेतला. हे सर्व बोगस होते. त्यानंतर हे पंधरा कोटी यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबाच्या खात्यामध्ये जमा झाले. त्यानंतर यशवंत जाधव यांनी हे पैसे संयुक्त अरब अमिराती येथे हलवले. त्यामुळे १५ कोटी रुपये रोख यशवंत जाधव यांनी दिले हे स्पष्ट होत आहे,” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.



