वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करतायत का ? आधी भाजी विक्रेत्यांचे स्थलांतर आता त्याच जागी बिल्डरचा राडारोडा

कर्वेनगर : कर्वेनगरमधील काकडे प्लाझा जवळील गालींदे पथ रस्त्यावर असणाऱ्या फेरीवाला क्षेत्र १८३ वरील परवाना धारक भाजी व फळ विक्रेत्यांना अचानक नोटिसा देऊन त्या ठिकाणाहून स्थलांतरित करण्यात आले. येथील रस्त्याच्या एका बाजूला मॉल होत आहे. तर दुसऱ्या बाजूला मोठा बांधकाम प्रकल्प सुरू झाला आहे. याच कारणावरून येथील भाजी विक्रेत्यांना स्थलांतरीत करण्यात आल्याची चर्चा कर्वेनगरमध्ये सुरू आहे. Under whose pressure do the officials of Warje Karvenagar Regional Office work?
ज्या ठिकाणी परवाना धारक भाजी विक्रेते बसत होते, त्या रस्त्याच्या बाजूला आता बांधकामाचा राडारोडा आणून टाकण्यात आला आहे. मात्र पालिका अधिकारी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी नक्की कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत ? याची चर्चा सध्या कर्वेनगर वारजे परिसरात रंगली आहे.

गालींदे पथ रस्त्यावर बसत असणारे भाजी विक्रेते पूर्वी कर्वेनगरच्या मुख्य चौकात बसत होते. त्या ठिकाणाहून त्यांना काकडे प्लाझा येथे हलवण्यात आले. त्यानंतर त्यांना मुख्य रस्त्यावरून आत गेलेल्या गालींदे पथ रस्त्यावर त्यांचे स्थलांतर करण्यात आले. याच फेरीवाला क्षेत्र १८३ वरील भाजी विक्रेत्यांना पुन्हा आता स्थलांतराचा फटका बसला आहे. दोन वर्षांपूर्वी दिवाळीच्या सुमारास अशीच त्यांच्यावर अचानक कारवाई करण्यात आली होती. परंतु आता वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समिती बैठकीत त्यांना स्थलांतरीत करण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
गालींदे पथ रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना स्थलांतरीत करण्याची कार्य तत्परता अधिकाऱ्यांनी दाखवली पण त्याच ठिकाणी बांधकामाचा राडारोडा आणून टाकणाऱ्यांवर मात्र कारवाई करण्याची तत्परता दाखवताना पालिका अधिकारी दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
स्थलांतराच्या नोटिसा मिळाल्यानंतर काही भाजी विक्रेत्यांनी नगरसेवकांच्या ही भेटी घेतल्या मात्र त्याचा उपयोग झाला नसल्याची चर्चा आहे. या कारवाईनंतर या परवाना धारक फळ भाजी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांच्या थकबाकीची ही नोटीस काढण्यात आली असून थकबाकी नाही भरली तर परवाना रद्द करण्यात येणार असल्याचे त्यात सांगण्यात आले आहे. त्यामुळे कारवाईवर न बोलण्यासाठी थकबाकी चे अस्त्र बाहेर काढण्यात आल्याचे बोलले जात आहे. येथील भाजी व फळ विक्रेत्यांना हटवण्यात आले असले तरी फेरीवाला क्षेत्र १८३ चा फलक काढायचा मात्र पालिकेकडून विसरला आहे.



या संदर्भात वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त संतोष वारुळे म्हणाले की, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समितीच्या बैठकीत ठराव मंजूर झाल्यानंतर फळे व भाजी विक्रेत्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे. थकबाकीच्या नोटिसा सर्वच भागात देण्यात आलेल्या आहेत. स्थलांतरित करण्यात आल्यानंतर त्या जागी पडलेल्या राडारोड्याची माहिती घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल.






