ATS चा धक्कादायक खुलासा : कोथरूडमधून पकडलेल्या दहशतवाद्यांनी केली होती बॉम्बस्फोटाची चाचणी

पुणे : कोथरूड पोलिसांनी नाकाबंदीत पकडलेल्या दोन दहशतवाद्यांना सत्र न्यायाधीश एस. व्ही. कचरे यांच्या न्यायालयाने मंगळवारी पाच ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, संबंधित दहशतवाद्यांनी पुणे, सातारा व कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) न्यायालयात सादर केलेल्या अहवालातून पुढे आली असून, आरोपींवर दाखल गुन्हय़ात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये कलमात वाढ करण्यात आली आहे.

मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान उर्फ अमीर अब्दुल हमीद खान (वय 23, रा. मिठानगर, कोंढवा. मूळ रा. ग्रीनसिटी, रतलाम, मध्यप्रदेश), मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी (वय 24, रा. मिठानगर, कोंढवा. मूळ रा. हरमाला कुलकुंडी, रतलाम, मध्यप्रदेश) अशी या दोघांची नावे आहेत. यातील मोहम्मद शाहनवाज शफीऊररहमान आलम (वय 31, रा. मिठानगर, कोंढवा. मूळ रा. पेलावल ता. हजारीबाग, झारखंड) हा संशयित दहशतवादी अद्याप फरार आहे. रात्री कोथरूड पोलीस ठाण्याचे कर्मचारी शिपाई प्रदीप चव्हाण, अमोल नाझ हे पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना तीन जण मोटरसायकल चोरत असल्याचा संशय आला. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर अधिक तपासात हे दोघेही अतिरेकी कारवायात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले होते.
या दोन्ही दहशतवाद्यांची पोलीस कोठडी संपल्याने दहशतवाद विरोधी पथकाने दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयात मंगळवारी हजर केले. त्यावेळी सत्र न्यायाधीश एस. व्ही. कचरे यांच्या न्यायालयाने त्यांना पाच ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दहशतवाद विरोधी पथकाने तपासादरम्यान दोन्ही आरोपींच्या घराची झडती घेतली. त्यामध्ये विविध वस्तू आढळून आल्या. त्यात इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह पांढरी पावडर सापडली. ही पावडर स्फोटकच असल्याचे एक्स्प्लोसिव्ह वेफर डिटेक्टरमध्ये स्पष्ट झाले आहे. तसेच पोलिसांच्या डॉग स्कॉडनेदेखील यासंबंधी पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला आहे. ही पावडर नेमके कोणते स्फोटक आहे, याच्या तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे त्याचे नमुने पाठविले असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे.






आरोपी हे अल सुफा या संघटनेची विचारधारा मानणारे असल्याची माहितीही समोर आली आहे. संबंधित आरोपी शोधण्यास पुणे पोलिसांनी तब्बल दीड वर्षे लागली. न्यायालयात विशेष सहकारी वकील उपस्थित असतानादेखील सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण वायकर यांनी त्यांना युक्तिवाद करू न देता स्वतःच बाजू मांडली.



