महिलांचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या बावधन मधील ‘सिद्धीच्या गणपतीला’ मिळाला २०२४ चा श्री. मोरया पुरस्कार व प्रथम क्रमांक

हा पुरस्कार केवळ आमच्या मंडळाचा नाही, तो आम्हाला साथ देणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा सन्मान : पियुषा किरण दगडे पाटील
पुणे : त्या एकत्र आल्या आणि त्यांनी पहिला महिलांचा गणपती बसवून एक आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करायचा याचा नवा पायंडा घातला. विविध क्षेत्रातील महिलांनी एकत्र येत बसवलेला पहिला महिलांचा गणपती म्हणून ज्यांचं नाव महाराष्ट्रभर झालं त्या सिद्धीचा गणपती महिला विकास मंडळाला संपूर्ण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून “श्री. मोरया पुरस्कार – प्रथम क्रमांक (२०२४) प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार जिंकून सिद्धीचा गणपती महिला विकास मंडळाने पुन्हा एकदा महिला कोणत्या क्षेत्रात मागे नाहीत हे सिद्ध केलं आहे.
पिंपरी चिंचवड शहराचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त सिंह यांच्या उपस्थित पार पडलेल्या सोहळ्यात ‘सिद्धीचा गणपती’ च्या महिला सदस्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
हा पुरस्कार केवळ आमच्या मंडळाचा नाही, तो आम्हाला साथ देणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा सन्मान आहे. परंपरा, सामाजिक बांधिलकी, आणि स्त्रीशक्तीचं नेतृत्व यांची सांगड जेव्हा एकत्र येती तेव्हा यश अटळ असतं. या यशामागील सर्व महिलांचे अथक प्रयत्न, आणि आम्हाला साथ देणाऱ्या प्रत्येकाचे मी मनःपूर्व आभार मानते. अशा शब्दात सिद्धीचा गणपती महिला विकास मंडळाच्या अध्यक्षा व बावधनच्या माजी सरपंच पियुषा किरण दगडे पाटील यांनी हा पुरस्कार मिळाल्यानंतर व्यक्त केल्या आहेत.

उत्तम देखावा, अत्युत्तम कार्यक्रम या बरोबर महिलांनी महिलांची ओळख वाढवून एकमेकींना आधार द्यावा, एकमेकांचा उत्साह वाढवावा, व्यवसायाला हातभार लागावेत, इतकंच नाही तर नवीन पिढी समोर उत्तम आदर्श ठेवावेत हा हेतू समोर ठेवून “सिद्धीचा गणपती” बसवला गेला. महिलांचा गणपती म्हणून नाव झालेल्या या सिद्धीच्या गणपतीला गणेशोत्सवात उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अमृता देवंद्र फडणवीस यांनी भेट देत या महिलांचे कौतुक केले होते.
पहिल्याच दिवशी व विसर्जनाला गणरायाची वाजतगाजत शिस्तबध्द निघणारी मिरवणूक, दहा दिवस विविध संस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाबरोबरच विविध स्पर्धांचे उत्तम नियोजन यातून महिलांनी आपली संस्कृती जपत आपल्या कार्य तत्परतेची चुणूक दाखवून दिली आहे.
असं म्हणतात, स्त्री ही अष्टावधानी असते. तिच्या डोक्यात असंख्य विचार एकाच वेळी चालू असतात. ती सजग असते, संयमी असते आणि तितकीच नाजूकही असते. परंतु योग्य वेळी ती स्वतःच्या माणसांसाठी झाशीची राणी देखील असते. हे तर सर्व आपण वाचत आलो आहोतच. पण आजची स्त्री याही पुढे जाऊन स्वतःसाठी उभं राहायला शिकतेय. इतिहासात अशा कणखर स्त्रियांची अनेक चरित्र आपण वाचली आहेत. पण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या स्त्रिया देखील कुठेही कमी नाहीत. मग ती गृहिणी असो, नोकरी करणारी असो वा व्यावसायिक..!! आणि अशाच सर्व गुणांनी सिद्ध असलेल्या स्त्रियांनी एकत्र येऊन पुण्यात बावधन मध्ये बसवलेला “सिद्धीचा गणपती” ला मिळालेला पुरस्कार एक प्रकारे या महिलांचा सन्मान आहे.






