कर्वे पुतळा चौकात मातीचा धुरळा ; नागरिक वैतागले, प्रशासन मात्र ढिम्मच

कोथरूड : कोथरूड मधील कर्वे पुतळा चौकात खोदून ठेवण्यात आलेला रस्त्याची चार दिवसांनतरही व्यवस्थित डागडुजी केली गेली नसल्याने उडणाऱ्या धुळीमुळे चौक परिसरात धुलीकणांच्या प्रदूषणात प्रंचड वाढ झाली आहे. या प्रकारामुळे रस्त्याने जाणारे वाहनचालक, परिसरातील सोसायट्यांनमधील नागरिक, व्यावसायिक मंडळींमध्ये संतापाची भावना आहे.
कर्वे पुतळा चौकातील रस्ता नवीन सिग्नल बसवण्यासाठी खोदण्यात आला अशी माहिती मिळत आहे. मात्र रस्त्यावर करण्यात आलेले खोदकाम अशा पद्धतीने माती टाकून बुजवण्यात आले आहे की, त्यातून जाताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सिग्नल सुटल्यानंतर या खोदलेल्या भागातून जाताना वेग कमी करावा लागत असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे त्याबरोबर वाहतूक कोंडीही निर्माण होत आहे.
रस्त्यावर काम केल्यानंतर रस्ता सुस्थितीत करणे आवश्यक असताना चार दिवस उलटून गेल्यानंतरही तो तसाच असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहनांमुळे खोदलेल्या रस्त्यावरून धुळीचे लोट उठून हवेत पसरत असल्याने हवेच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांना श्वसनाचे व ॲलरजीक सर्दीचा त्रास होऊ लागला आहे.
या प्रकारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असला तरी प्रशासनाचे मात्र त्याकडे दर्लक्ष होत आहे. प्रशासन नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी आहे का वाढवण्यासाठी असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे. राजकीय स्थानिक नेते ही यावर काही बोलत नसल्याने प्रशासनालाही काही फरक पडत नसल्याचे दिसत आहे.




