मनोज जरांगे पाटील यांनी अभ्यास करावा, ते अजून लहान : नारायण राणे

पुणे : कुठल्याही राजकीय नेत्याने मराठा आणि ओबीसी अशी झुंज लावून देऊ नये. कुणाचंही आरक्षण काढून मराठ्यांना द्यावं या मताचा मी नाही. मनोज जरांगे पाटील यांनी अभ्यास करावा ते अजून लहान आहेत. मराठा समाज ओबीसींचं आरक्षण कधीही घेणार नाही, असं मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले आहे.

आरक्षण कसं मिळतं? भारतीय घटनेत काय तरतुदी आहेत त्यांच्याविषयी मनोज जरांगे पाटील यांनी वाचावं. मराठ्यांना विचारावं ते ओबीसी आरक्षण घ्यायला तयार आहेत का? मराठा आरक्षणावर मी काही भविष्यवाणी वर्तवू शकत नाही. कारण मराठ्यांना आरक्षण यावर प्रत्येक नेत्याची मागणी वेगळी आहे.



मी मगाशीही स्पष्ट केलं आता पु्न्हा सांगतो, कुणाचंही आरक्षण काढून मराठ्यांना आरक्षण न देता ५२ टक्क्यांच्या वर भारतीय घटनेच्या १५/४ प्रमाणे आरक्षण द्यावं. मागास आयोगाकडे पाठवावं, त्याचा सर्व्हे केला जावा. त्यानंतर सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं हे माझं मत आहे,असं राणे म्हणाले.


