श ष – न ण चा उल्लेख केलेल्या पोस्टमुळे सोनाली कुलकर्णी ट्रोल; अखेर पोस्ट केली डिलीट
पुणे : मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मराठी भाषा दिनानिमित्त दिलेल्या वादग्रस्त शुभेच्छांमुळे तिला जोरदार ट्रोलचा सामना करावा लागला आहे. जोरदार ट्रोल झाल्यामुळे सोनालीने अखेर ही फेसबुक पोस्ट डिलीट केली आहे.

सर्वत्र मराठी राजभाषा दिन साजरा केला जात असताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने एक फेसबुक पोस्ट लिहिली होती, त्यात तिने मराठी राजभाषा दिनाच्या वादग्रस्त शुभेच्छा दिल्या होत्या, त्या ती म्हणाली होती. न आणि ण, श आणि ष, ळ आणि ड, चांदणी मधील च आणि चंद्रा मधील च, जहाजा मधील ज आणि जीवनामधील ज यांच्या उच्चारातील फरक कळणार्यांना मन:पूर्वक शुभेच्छा! बाकीच्यांना मराठी भाशा दीणाच्या मणापासून षुभेच्च्या !!!



अशा शुभेच्छा दिल्यानंतर तिच्या या शुभेच्छांवर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. एकाने तु ज्या अशुद्ध मराठीबद्दल बोलत आहेस, ती भाषा बोलणारी एकमेव भूमिका नटरंगमधली तुला ओळख मिळवून द्यायला पुरेशी ठरली. त्याच्या आधी आणि त्याच्या नंतर तुझे काही कर्तृत्व दिसलं नाही. गावरान बोलीभाषेतला सैराट देशाने डोक्यावर घेतला. बाकी तुमच्या न आणि ण ने मराठी चित्रपट सृष्टीची काय वाट लावली हे तु स्वतः कडे बघून अंदाज लावु शकतेस. असं म्हटलं आहे. तर एकाने पुणे णे णे कमेंट करत स्माईली टाकली आहे. तर एकाने इंग्रजीत कमेंट करत मराठी लेखकांच्या घरी त्यांची मूल इंग्रजीत बोलतात असं म्हटलं आहे. राजकीय नेत्यांची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकतात आणि ते भाषणं मात्र मराठी जगली पाहिजे, अशी देतात यावरही अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. नागरिकांच्या या संतापानंतर सोनालीने ती पोस्ट डिलिट केली आहे. प्रा. हरी नरके यांनी याबाबत म्हटलं आहे की,
सोनाली कुलकर्णी या लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी मराठी गौरव दिनाच्या निमित्ताने न, ण, श ष आदी उच्चारातला फरक न कळणारांना हिनवणारी पोस्ट टाकली.
हे लोक मराठीचे हितकर्ते आहेत की अजूनही यांचा उच्चारांचा अहंकार जात नाहीये?
आशय काय आहे यापेक्षा फक्त व्याकरण बघणारी ही वृत्तीच मराठीचं जग संकुचित करते. गुणवत्ता आशयात असते, उच्चारात नाही हे यांना अजून कसे कळत नाही?
: प्रा. हरी नरके



