खाजगी कंपनीच्या फायद्याची कोरोना कवच आरोग्य विमा योजनेची प्रक्रिया थांबवा : धुमाळ

पुणे : पुणे महापालिकेच्या शहरी गरीब योजनेतील सभासदांना कोरोना आजारासाठी कोरोना कवच आरोग्य विमा योजना राबविणेबाबत एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागविण्यात आले आहेत. या अंतर्गत कोरोना झाल्यास उपचाराचा खर्च सदर कंपन्यांकडून घेऊ महापालिकेचे पैसे वाचवणार असा आभास तयार करून महापालिकेच्या तिजोरीवर हात मारण्याचा प्रकार चालू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केला आहे. या विषयासाठी पालिकेकडून सल्लागार नेमण्यात येणार असून यातून विशिष्ठ कंपनीचे हीत साधण्याचा प्रकार होणार आहे. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया तातडीने थांबवण्याची मागणी धुमाळ यांच्याकडून करण्यात आली आहे.
याबाबतचे पत्र महापालिका आयुक्तांना धुमाळ यांच्याकडून देण्यात आले आहे. सध्या महानगरपालिकेने महात्मा फुले जन आरोग्य योजना स्विकारली असून या योजनेनुसार उपचार घेता येणार आहेत. तसेच केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना असून त्यानुसार देखील,उपचार घेता येतात. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून कोरोनावरील उपचार महात्मा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत करणेबाबत शासन निर्णय केलेले आहेत तरी देखील महापालिकेकडून आरोग्य विमा योजनेसाठी खाजगी कंपनीला नेमुन नागरिकांचे कररुपी पैसे वाया घालवणे नक्की कोणाचे हिताचे आहे ? असा प्रश्न धुमाळ यांनी उपस्थित केला
पुणे महापालिका, राज्य शासन व पीएमआरडीए यांच्या संयुक्त विद्यमाने जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. पालिकेचे कोविड सेंटर्सही आहेत. आजपर्यंत हजारो रूग्ण याठिकाणी उपचार घेवून बरे झाले आहेत. ही सर्व यंत्रणा असताना कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस जेव्हा वाढत होते, तेव्हा अशा प्रकारे प्रशासन कार्यतत्पर का नव्हते ? विमा योजना करणे ही धोरणात्मक बाब आहे. मनपा प्रशासन मुख्य सभेच्या निदर्शनास न आणता, मान्यता न घेता परस्पर एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागविण्यात आले असल्याचे धुमाळ यांनी म्हंटले आहे.
महापौरांनी पुणे मनपाच्या सेवकांसाठी सुरक्षा कवच योजना आणली होती. या योजनेनुसार विमा कंपनीकडून कोरोनाने मृत झालेल्या सेवकांना देण्यात येणारा आर्थिक लाभ अद्याप मिळालेला नाही. विमा कंपनीकडून विविध कारणे दाखवत मनपा सेवकांना रक्कम देण्यात आलेली नाही. असे असतानाही पुन्हा आपण खाजगी कंपनीचा विमा काढणेसाठी प्रिबिड बैठक घेतो. या कंपन्यांकडून उपचाराचा खर्च न मिळाल्यास कोणास जबाबदार धरणार याबाबत शाश्वती नाही. तरी सदर प्रकरणी चालू असलेली कार्यवाही तातडीने स्थगित करून पुणे मनपाची यंत्रणा सुरळित ठेवावी व या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची माहिती लेखी स्वरूपात देण्यात यावी अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.



