सुषमा अंधारेंकडून शरद पवारांकडे अजित पवारांची तक्रार
सातारा : सत्ताधाऱ्यांवर तुटून पडणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांच्या अश्रुंचा बांध आज फुटला. शरद पवार यांची उपस्थिती असलेल्या कार्यक्रमात सुषमा अंधारेंनी विरोधकांकडून खालच्या पातळीवर टीका होत असल्याची खंत व्यक्त केली. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानाच्या अनुषंगाने अंधारेंनी विरोधी पक्षनेत्यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केली नसल्याची तक्रार शरद पवारांकडे केली.
भारतीय भटके-विमुक्त विकास संशोधन संस्थेमार्फत फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. जकातवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी सुषमा अंधारेंना मनोगत व्यक्त करताना अश्रू अनावर झाले आणि रडतच त्यांनी भाषण केलं.
सुषमा अंधारे म्हणाल्या,‘आदरणीय साहेब, हे आपल्यासमोर फार धाडसाने याच्यासाठी मांडलं पाहिजे. आता ज्या पद्धतीने… इथे राजकारणाचा विषय नाही, पण आवर्जून सांगितलं पाहिजे. अश्लाघ्य पद्धतीने आमदार जेव्हा माझ्याबद्दल टिप्पणी करतात आणि एकाही पोलीस स्टेशनला त्याची तक्रार लिहून घेतली जात नाही. मला अपेक्षित होतं सर. सभागृहात आपण सगळे विरोधी पक्षनेते म्हणून बाकावर बसतो. का ती एफआयआर लिहून घेतली नाही. खरं की खोटं नंतर. सगळा मजकूर सार्वजनिक आहे. तरी सुद्धा सभागृहात विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्न विचारायला हवा होता सर. माझं चुकत असेल, तर आपण कान पकडा. मी लाखवेळा माफी मागायला तयार आहे. कारण मी आपल्याकडे हक्काने बोललंच पाहिजे’, असं सांगताना सुषमा अंधारेंच्या अश्रुंचा बांध फुटला. त्यांनी विरोधी पक्षनेत्यांनी हा मुद्दा सभागृहात मांडला नाही म्हणून खंत वजा तक्रारही पवारांकडे केली.