विरोधी पक्ष नेत्यांचा भाजपला टोला

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी पुणेकरांच्या सोयीसाठी जंबो रुग्णालय उभारून दाखवले
पुणे : पुणे शहरात वाढत चाललेले कोरोनाचे संकट नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी घोषणा करून पुणेकरांच्या सोयीसाठी युद्ध पातळीवर जंबो रुग्णालय उभारून दाखवले असल्याचे विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी सांगितले.
या रुग्णालयाचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्याकडून राजकारण करण्यात आल्याचा आरोप धुमाळ यांनी केला आहे. फक्त पुणे महापालिकाच काम करीत असल्याचा दिखाऊपणा केला गेला. राज्यशासन काहीच करीत नसल्याचे आरोप केले. पण या आरोपाकडे दुर्लक्ष करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आपल्या कामाकडे लक्ष दिल्याने आज जंबो रुग्णालय पुणेकरांच्या सेवेत सुरू होऊ शकले असल्याचे धुमाळ यांनी म्हंटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) ८०० खाटांचे हे सुसज्ज कोविड रुग्णालय अठरा दिवसांच्या अत्यंत कमी वेळेत बांधून पूर्ण केले आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ३२ हजार चौरस मीटर मैदानावर हे १३ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे रुग्णालय उभे राहिले आहे. या रुग्णालयात ६०० खाटा संपूर्णपणे वातानुकूलित असून दोनशे खाटा या आयसीयूसाठी स्वतंत्रपणे राखीव असतील. एखाद्या रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये असलेल्या सर्व सोयी सुविधा तसेच प्रशिक्षित डॉक्टर असणार आहेत. या रुग्णालयामुळे कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणे आता सोपे होणार असल्याचे त्या म्हणाल्या.



