बालहत्याकांडप्रकरणी गावित बहिणींची फाशीची शिक्षा रद्द; जन्मठेपेत रूपांतर

मुंबई : बालहत्याकांडप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या कोल्हापूर येथील रेणुका शिंदे व सीमा गावित या बहिणींची फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रूपांतर करण्यात आले आहे.
नऊ बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींना मरेपर्यंत जन्मठेप सुनावण्यात आली आहे. फाशीच्या अंमलबजावणीला विलंब केल्याच्या कारणास्तव दोघी बहिणींनी फाशीचं जन्मठेपेत रुपांतर करण्याची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने त्यांची फाशी रद्द केली आहे.
सीमा गावित आणि रेणुका शिंदे यांना सत्र न्यायालयाने 2001 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टानेही सत्र न्यायालयात निर्णय ग्राह्य धरत शिक्षा कायम ठेवली होती. तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनीदेखील शिक्षेवर शिक्कामोर्तब केले होते. मात्र शिक्षेची अंमलबजावणी रखडल्याने दोन्ही बहिणींनी कोर्टात धाव घेतली होती.
अंमलबजावणीत झालेल्या विलंबाच्या कारणास्तव फाशीचे जन्मठेपेत रूपांतर करण्याच्या मागणीसाठी गावित बहिणींनी अॅड्. अनिकेत वगळ यांच्यामार्फत याचिका केली होती. न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर 18 डिसेंबरला गावित बहिणींच्या याचिकेवरील निकाल राखून ठेवला होता. न्यायालयाने निकाल देताना राज्य सरकारकडून झालेल्या अक्षम्य विलंबाबाबत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. आरोपींचा गुन्हा माफीस पात्र नाही, मात्र प्रशासनाने दिरंगाई केली अशा शब्दांत हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली.
गावित बहिणींनी केलेल्या गुन्ह्याचे गांभीर्य आणि त्या पुनर्वसन करण्याच्या पलीकडे आहेत हे लक्षात घेता त्यांच्या फाशीच्या शिक्षेचेच आम्ही समर्थन करत असल्याची भूमिका राज्य सरकारने मांडली होती. त्याच वेळी या दोघींची फाशीची शिक्षा रद्द करून त्याचे जन्मठेपेत रूपांतर केल्यास कोणत्याही सवलतीविना जन्मठेप द्यावी, हे आधी केलेले पर्यायी म्हणणेही मागे घेत असल्याचंही सरकारतर्फे सांगण्यात आलं होतं. गावित बहिणींना 1996 मध्ये अटक झाल्यानंतर गेल्या 25 वर्षांपासून त्या कारागृहातच आहेत.




