तीनच्या प्रभाग रचनेत पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता येणार ; विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांचा विश्वास

पुणे : pune city, pmc election आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मुंबई वगळून इतर शहरांसाठी तीनचा प्रभाग करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे, त्यामुळे आता पुणे नगरपालिकेची निवडणूक ही तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार असल्याचे निश्चित झाले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, तीनच्या प्रभाग पद्धतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जास्त फायदा होणार असून पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
धुमाळ म्हणाल्या की उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुणे महापालिकेची निवडणूक लढवताना महानगर पालिकेत राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील याचा विश्वास वाटत आहे. प्रभाग रचना कशीही झाली असती तरी त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होणार होता कारण चालू पाच वर्षांमध्ये महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून पुणेकरांची घोर निराशा करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत पुणे महापालिकेत महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असणार हे निश्चित आहे.
गेले अनेक दिवस महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी कितीचा प्रभाग होणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या. राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता असल्याने महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकचा किंवा दोनचा प्रभाग केला जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता, परंतु आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीनचा प्रभाग करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने महापालिकेसाठी कितीचा प्रभाग होणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.




