शरद पवारांना हिंदू शब्दाची ॲलर्जी : राज ठाकरे

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना हिंदू शब्दाची ॲलर्जी असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. मशिदीवरील भोंगे 4 मेपर्यंत उतरायलाच हवे. अन्यथा मशिदीसमोर लाऊडस्पीकर लावून दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा वाजवू विनंती करूनही समजत नसतील तर होऊन जाऊ द्या! अशी चिथावणीही राज ठाकरे यांनी दिली.
महाराष्ट्रात मला कोठेही दंगली घडवायच्या नाही, तशी माझी इच्छाही नाही. लाऊडस्पीकर हा सामाजिक विषय आहे, तो धार्मिक विषय नाही. पण तुम्ही याला धार्मिक वळण देत असाल तर आम्हीही त्याचे उत्तर धर्मानेच देऊ असा घणाघात राज ठाकरे यांनी केला. ठाकरे म्हणाले, टोकाची भूमिका घ्यायची आमची इच्छा नाही, उत्तर प्रदेशात लाऊडस्पीकर उतरवले जात असतील तर महाराष्ट्रात का नाही असा सवाल करून सर्वच्या सर्व भोंगे अनाधिकृत असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्राच्या घराघरात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराज पोहचवले; त्या पुरंदरेंना शरद पवार वृद्धापकाळात त्रास देत होते, ते ब्राम्हण होते म्हणून त्यांना त्रास दिला जात होता असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
पवार स्वतःच जाती-जातीत विष कालवतात अशी जहरी टीका करून हातात पुस्तक घेतले की लेखक कोणत्या जातीचा आहे हे शरद पवार बघतात असेही ते म्हणाले. रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू आहेत असे कुणाही म्हटले नाही, पण शरद पवार आणि राष्ट्रवादीने या विषयाचे राजकारण केले. शिवाजी महाराजांवर रामदासांएवढे कुणीही एवढे दर्जेदार लिहिले नाही असेही राज ठाकरे म्हणाले.
ज्या दिवसापासून मी शरद पवार नास्तिक असल्याचे सांगितले, तेव्हापासून पवार त्यांचा फोटो देवासोबत लावत आहेत. समाजवादाचा विचार याच महाराष्ट्रातून गेला, राष्ट्रवादाचा विचार याच महाराष्ट्रातून गेला आणि हिंदुत्वाचा विचारही याच महाराष्ट्रातून गेला. पवारांनी आपली नौटंकी थांबवावी ते ध्रुवीकरणाचे राजकारण करतात. मी जात मानत नाही हे पवारांनी समजून घ्यावे. तुम्हाला ‘हिंदू’ या शब्दाची अॅलर्जी आहे. जातीच्या वर उठून आपण मराठी कधी होणार, हिंदू कधी होणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मी शरद पवारांना नास्तिक म्हटले तर त्यांना झोंबले त्यावर शरद पवार मला म्हणतात की, राज यांनी त्यांच्या आजोबाचे पुस्तक वाचावे. मी माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तके वाचली आहेत. मी वाचलेले पुस्तक व्यक्तीसापेक्ष आहे पवारांसारखे जाती-जातीत भांडणे लावणारे नव्हते असा घणाघात करीत ठाकरे यांनी आजोबा भटभिक्षुकीच्या विरोधात होते पण ते धर्म माननारे होते अशी आठवणही शरद पवार यांना त्यांनी करून दिली.
शिवाजी महाराजांच्या मृ्त्यूनंतर औरंगजेब महाराष्ट्रात आला आणि येथेच त्याचा मृत्यू झाला. औरंगाजेबाने लिहिलेली पत्र पाहिल्यास त्यात नमुद आहे की मला शिवाजी अजूनही छळतोय अर्थात औरंगजेबाला कळले होते की, शिवाजी व्यक्ती नाही तर एक विचार आहे असेही ठाकरे म्हणाले.







