
पुणे : पुण्यातील ससून जनरल हॉस्पिटलमध्ये सुषमा आकाश प्रकाशे यांच्या मुलाचा जन्म झाला. गर्भधारणे दरम्यान उशिरा बाळाला ट्यूमर असल्याचे निदान झाल्याने गर्भपात करता आला नाही. ससून रुग्णालयातील प्रसूतीतज्ज्ञ डॉ. शिल्पा नाईक यांच्या देखरेखी खाली आईच्या सामान्य प्रसूतीने बाळ जन्मले. हॉस्पिटलमधील लहान मुलांच्या सर्जननी बाळाचे ऑपरेशन केले.
बाळाला ओटीपोटात सूज, उच्च रक्तदाब आणि श्वास घेण्यास त्रास असल्याने इमर्जन्सी शस्त्रक्रिया करावी लागली. बाळाच्या पोटात 10.6 सेमीx7.2 सेमीx 11.5 सेमी आकाराची डाव्या मूत्रपिंडाशी संलग्न गाठ होती. ज्यामुळे पोटाचा जवळजवळ संपूर्ण डाव्या बाजूचा भाग व्यापला गेला होता. शस्त्रक्रियेने डाव्या मूत्रपिंडाला कुठलीही इजा होऊ न देता पूर्ण ट्यूमर/ गाठ काढण्यात बाळाला यश आले. काढलेल्या ट्यूमरचे वजन 550 ग्रॅम होते. शस्त्रक्रियेनंतर बाळाची तब्बेत स्थिर आहे.
पेडीयाट्रिक सर्जरी विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी नलबले – भोसले यांच्यासह डॉ. रुपेश सिकची आणि डॉ. नयना रामचंदानी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शस्त्रक्रिया केली. भूलतज्ज्ञ डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. सुनीता खेडकर आणि टीमने बाळाला भूल दिली. स्टाफ नर्स उज्ज्वला गरूड आणि स्वाती डोईफोडे यांनी शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना सहकार्य केले.
ऑपरेशनने काढलेल्या ट्यूमरचे वजन 550 ग्रॅम इतके होते तर जन्मावेळी बाळाचे वजन 3.5 किलो होते. ट्यूमरला बऱ्याच रक्तवहिन्या जोडलेल्या होत्या, ज्यामुळे कारण रक्तस्त्रावासारखी व हृदयक्रिया बंद पडण्यासारखी गुंतागुंत न होता तो काढून टाकणे हे अतिशय कठीण काम होते. तरीही डॉक्टरांनी हे अतुलनीय मिशन अत्यंत कष्टाने पार पाडले. ट्यूमर खूप मोठा असल्याने ऑपरेशन थिअटरमध्ये रक्त आणि सफेद रक्त उपलब्ध ठेवण्यात आले होते.

शस्त्रक्रियेनंतरच्या काळात त्याचे महत्त्वाचे मापदंड स्थिर असले तरी नवजात बाळातील कावीळच्या पार्श्वभूमीवर त्याला फोटोथेरपीची आवश्यकता होती. आता, बाळ बरे झाले आहे. त्याचा रक्तदाब स्थिर झाला आहे, जखम बरी झाली आहे आणि बाळाला लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे. विविध कारणांमुळे जन्मानंतरच्या सुरुवातीच्या काळात 3 बाळांना गमावल्यामुळे, आईचा एकदा घटस्फोट झाला असल्याने पालकांसाठी हे मुलं अतिशय मौल्यवान आहे. एव्हढ्या कठीण परिस्थितीतही अगदी देवदूताप्रमाणे ससूनच्या डॉक्टरांनी आमच्या बाळाला दुसरे जीवन दिले आहे. डॉक्टरांचे व ससून रुग्णालयाचे आभार मानण्यासाठी शब्दही अपुरे पडतात हे पालकांचे उद्गार या प्रयत्नांना भरभरून दाद देतात.‘पेडियाट्रिक सर्जरी या सुपरस्पेशालिटी विभागातील डॉक्टर नियमितपणे अधिकाधिक जटिल शस्त्रक्रिया करत आहेत आणि आता आम्ही नवजात बाळांना चांगल्या दर्जाच्या शस्त्रक्रिया सेवा देऊ शकतो. आमच्या टीमचा मला अभिमान आहे,’ असे डीन डॉ. विनायक काळे म्हणाले.



