नवाब मलिकांच्या घरी ईडी अधिकाऱ्यांची धडक, चौकशीसाठी घेतले ताब्यात

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी अधिकाऱ्यांनी नेल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयात नेण्यात आले असल्याचे वृत्त आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीने समन्स पाठवले होते.
ईडीनं सकाळ सकाळी केलेल्या कारवाईमुळे चर्चांना उधाण आलं आहे. नवाब मलिक यांच्यावर करण्यात आलेली ही कारवाई सूडाचं राजकारण असल्याचा आरोपा मलिकांच्या समर्थकांनी केला आहे. नवाब मलिकांचे कार्यकर्ते आता मोठ्या संख्येनं ईडी कार्यालयाबाहेर पोहोचून त्यांना समर्थन देणार असल्याचं सांगितलं जातंय.
तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी ईडीच्या कारवाईमागे कोणत्याही प्रकारचं सूडाचं राजकारण नसल्याचं म्हटलं आहे. या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाच्या बाहेर पोलिस फौजफाटाही वाढवण्यात आलेला आहे.




