समान पाणीपुरवठा योजनेत पाण्याचे मीटर बसावा अन्यथा गुन्हा दाखल करू ; नागरिकांना दिला जातोय त्रास.

वारजे माळवाडीतील प्रकार
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वतीने पुणे शहरात समान पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत मीटर बसवताना नागरिकांना मीटर बसावा अन्यथा गुन्हा दाखल करू असे धमकावले जात आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळे योजनेचे काम पूर्ण झाले नसताना मीटर बसवण्यासाठी नागरिकांना का त्रास दिला जात आहे असा सवाल विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी उपस्थित केला असून चुकीच्या पद्धतीने एल अँड टी कंपनीचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
धुमाळ यांनी सांगितले की नवीन समाविष्ट गाव व उपनगरे या भागांमध्ये अद्याप पुरेसा पाणीपुरवठा पुणे महानगरपालिकेमध्ये मार्फत आवश्यकतेनुसार होत नाही. पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने अनेक नागरिकांची तक्रार आहे. त्यामध्येच एल अँड टी कंपनीच्या मार्फत घरोघरी पिण्याचा पाण्याच्या लाईनीला मीटर बसवण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. ते काम सुरू असताना नागरिकांना त्या ठिकाणी धमकावून व बळजबरीने आपण जर मीटर तातडीने बसवून दिले नाही तर आपणावर गुन्हे दाखल करू, कारवाई करू असे घाबरवून व नागीरीकांना दमदाटी करून मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी वारजे परिसरात व परीसरातील सोसायट्या व बैठ्या घरांमधून येत आहेत. मिळालेल्या आमच्या माहितीनुसार असे निदर्शनास आले आहे कि हे मीटर बसविल्यानंतर वर्ष सहा महिन्यांनी याचा वापर सुरु होणार आहे जर असे असेल तर आत्ताच हे मीटर बसविण्याची घाई का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्या पावसाळा सुरू असल्याने सदर मीटर बसवताना पाईप लाईन खोदली जाते व त्यावर मीटर बसवला जातो
अशातच काही ठिकाणी पाईप लाईन लिकेज होते खोदलेली पाईप लाईन त्याच अवस्थेत हे कर्मचारी ठेऊन देतात त्यामुळे पावसाचे दूषित पाणी हे पिण्याच्या पाण्यामध्ये एकत्रित होऊन रोगराई वाढण्याची शक्यता निर्माण होऊ लागली आहे. मीटर बसवताना केलेली खोदाई व पाईप लाईनची झालेली तुटफुट ही संबंधित कंपनीने दुरुस्त करणे गरजेचे असताना सदर कर्मचारी दुरुस्त करून देत नाहीत. सदर मीटर आता घाई गडबडीत बसवून वर्ष सहा महिन्यांनी सुरु होणार असतील तर घाई करणे चुकीचे आहे व हे मीटर सहा महिन्यांनी व्यवस्थित राहतील किंवा चालू स्थितीत राहतील याची शंका आहे त्यामुळे आता पावसाळा असल्याने हे मीटर बसविण्याची घाई करू नये व संबंधितांना काम थांबवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी धुमाळ यांनी पुणे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

समान पाणीपुरवठा योजना राबविण्यास विरोध नाही पण या योजनेचा नागरिकांना फायदा काय याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. पण तसे न करता सरळ नागरिकांना नोटीस देऊन गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जात आहे. हे काम करत असताना महापालिकेचा एक अधिकारी एल अँड टी कंपनीच्या कर्मचाऱ्यांबरोबर नसतो. अनेक ठिकाणी कामे बाकी असताना सुरू असलेला हा सावळा गोंधळ थांबवावा अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.



