अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरुंची बैठक

मुंबई : अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कृषी व अकृषी विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत घेण्यात येणाऱ्या परीक्षांबाबत महत्त्वाची चर्चा झाली.
सर्वोच्च न्यायालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजिसी) मार्गदर्शक सूचनांनुसार दिनांक १५ सप्टेंबर ते दिनांक ३१ ऑक्टोंबर पर्यंत निकालासह परीक्षा प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा, परीक्षेसंदर्भात गठीत केलेल्या समितीचे अध्यक्ष, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर उपस्थित होते.
याबाबतचा समितीचा अहवाल व्यवस्थापन परिषद आणि विद्यापीठाच्या परीक्षा मंडळासमोर ठेवून दोन दिवसात शासनाने कळवावे तसेच आपत्कालीन प्राधिकरणाची बैठक मंगळवारी घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करावी अशी सूचना राज्यपालांनी केली. परीक्षा पद्धती संदर्भात विद्यापीठाने व्यवस्थापन परिषद आणि परीक्षा मंडळांमध्ये परीक्षेसंदर्भात गठीत केलेल्या समितीचा अहवाल सादर करून परीक्षापद्धती निवडावी असे राज्यपाल यांनी सांगितले.
सामंत म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होईल. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिनांक ३० सप्टेंबर २०२० पर्यंत परीक्षा घेण्याच्या मार्गदर्शक सूचना आहेत याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र पाठवून महाराष्ट्रातील covid-19 ची सद्य परिस्थिती सांगून परीक्षेचे केलेले नियोजन कळविण्यात येईल. तसेच एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून अपवादात्मक परिस्थितीमध्ये विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिला तर अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे सुद्धा नियोजन करण्यात यावे याबाबत चर्चा झाली.



