राणेंच्या वक्तव्याचा जयंत पाटलांकडून समाचार

महाविकास आघाडीचं सरकार नसतं तर जयंत पाटील भाजप मध्ये असते असा दावा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केल्यानंतर त्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जयंत पाटील यांनी म्हंटले आहे की, दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस आहे राणे साहेब !
पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. त्यांनी म्हंटले आहे की, राणे साहेबांची भाजपच्या वरीष्ठ नेत्यात गणती होत नाही हे जाणून खेद झाला. भाजपच्या कुठल्या वरिष्ठ नेत्यांशी माझी कधी, कुठे चर्चा झाली याचा तपशील मला कळला तर माझ्या ज्ञानात भर पडेल.

माझ्या पुरते सांगायचे झाले तर माझी भाजपच्या कोणत्याही वरीष्ठ नेत्याशी भाजपमध्ये जाण्याबाबत चर्चा झाली नाही म्हणून हा खुलासा. मी शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता असल्याने असा विचार माझ्या मनात कधीच शिवत नाही. त्यामुळे मागील ५ वर्षे सरकारच्या विरोधात विधीमंडळात लढत होतो.



दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस आहे. आलेली सत्ता जाते व ती पुन्हा मिळवता येते ही पवार साहेबांची शिकवण आहे. त्यामुळे सत्ता हा विषय माझ्यासाठी गौण असल्याचे पाटील यांनी म्हंटले आहे.






