संभ्रम दूर करून RTE प्रवेश प्रक्रिया सुरू करावी ; केलेले बदल तातडीने रद्द करावेत : बाबा धुमाळ यांची मागणी

पुणे : सन २०१२ – १३ पासून RTE २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेमुळे वंचित गटातील तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे. शासनाने आतापर्यंत अतिशय योग्य आणि चांगल्या प्रकारे ही प्रक्रिया राबवली आहे. परंतु सध्या प्रसार माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांनुसार नक्की RTE बाबत काय धोरण आहे याबाबत सर्वांमध्ये संभ्रम निर्माण झालेलाआहे. ही संभ्रम अवस्था दूर करून योग्य ती प्रक्रिया प्रशासनाने तातडीने राबवावी अशी मागणी शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी केली आहे.

या संदर्भातील निवेदन धुमाळ यांनी शिक्षण आयुक्तांना दिले आहे. धुमाळ म्हणाले, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०११ यामध्ये RTE २५% प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने सुधारणा करण्याबाबतच्या अधिसूचना ९ फेब्रुवारी २०१४ रोजी राजपत्रात अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही सुधारणा विचारात घेऊन सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाची RTE २५% प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबत कार्यवाही तात्काळ करण्यास सांगितली आहे. तसेच नव्या बदलानुसार एक किलोमीटर परिसरात शासकीय किंवा अनुदानित शाळा असल्यास पाल्याला विनाअनुदानीत शाळेत प्रवेश घेता येणार नाही. तसेच या प्रवेश प्रक्रियेत खाजगी विना अनुदानित शाळेत प्रवेश निवडण्याचा पर्याय नसणार आहे. त्यामुळे आर्थिक सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थाना थेट शिक्षण नाकरले जाणार आहे.
त्यामुळे गरीब व श्रीमंत असा मुलांना मध्ये भेदभाव निर्माण होईल. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणे व RTE अंतगर्त विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणे हे मूळ कायद्याला मोडीत काढणारे व घटनाबाह्य आहे असा आरोप धुमाळ यांनी केला आहे.
गरीब विद्यार्थ्यांना खाजगी विनाअनुदानित शाळा निवडण्याचा हक्कही गमवावा लागत आहे. बरेच.विद्यार्थी चांगल्या शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. या सर्व बाबींचा विचार करून योग्य तो निर्णय घेण्यात यावा व महाराष्ट्र शासनाने RTE अंतर्गत गेलेले बदल तातडीने रद्द करावेत अशी मागणी धुमाळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.









