२ हजार ७७७ विद्यार्थी अद्याप शिष्यवृत्तीपासून वंचित ; तातडीने शिष्यवृत्ती देण्याची दिपाली धुमाळ यांची मागणी..

पुणे : महापालिकेतर्फे इयत्ता १० वी, १२वीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीची २० कोटी रुपयांची तरतूद संपल्याने २ हजार ७७७ विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती मिळालेली नाही. यासाठी ६ कोटी रुपयांची गरज असल्याने ही रक्कम तातडीने उपलब्ध करून विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये शिष्यवृत्ती जमा करावी अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.
धुमाळ यांनी याबाबतचे पत्र महापालिका आयुक्तांना दिले आहे. महापालिकेतर्फे इयत्ता १०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीची २० कोटी रुपयांची तरतूद संपली असल्याने २ हजार ७७७ विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत शिष्यवृत्ती देण्यात आलेली नाही नाही. या उरलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी ६ कोटी रुपयांची गरज आहे. हा निधी उपलब्ध होईपर्यंत आणखी काही दिवस विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची वाट पहावी लागणार आहे.
धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार २०२०-२१ साठी महापालिकेकडे इयत्ता १०वीचे ७ हजार ८७८ आणि इयत्ता १२वीचे ८ हजार ९६ असे १५ हजार ९७४ विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. पडताळणीनंतर १३ हजार ३१ अर्ज पात्र ठरले आहेत. तर २ हजार ९४३ जणांचे अर्ज अपात्र ठरले. पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम ३१ मार्च पूर्वी थेट बँक खात्यात जमा केली जाणार होती. १० वीच्या ५ हजार ५५३ जणांच्या बँक खात्यात ८ कोटी ३२ लाख ९५ हजार रुपये तर १२वी च्या ४ हजार ७०१ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ११ कोटी ७५ लाख २५ हजार रुपये जमा केले आहेत.
इयत्ता १०वीच्या ७९८ तर इयत्ता १२वीच्या १ हजार ९७९ विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती मिळालेली नाही. महापालिकेकडून या विद्यार्थ्यांना तुमचा शिष्यवृत्तीचा अर्ज मंजूर झाला आहे, शिष्यवृत्ती जमा केली जाईल असे मेसेज मोबाईलवर गेले आहेत. पण एप्रिल महिना संपत आला तरी पैसे जमा न झाल्याने पालक, विद्यार्थ्यांकडून याची चौकशी सुरू झाली आहे.
२०२०-२१ च्या अंदाजपत्रकातील शिष्यवृत्तीची
२० कोटीची तरतूद संपली आहे. उर्वरित २ हजार ७७७ जणांच्या शिष्यवृत्तीसाठी ६ कोटी १४ लाख ४५
हजार रुपयांची गरज आहे. विद्यार्थ्यांचे अर्ज आल्यानंतर रक्कम किती लागेल हे कळते. असे असताना मग आधीच रक्कम का उपलब्ध केली गेली नाही असा सवाल धुमाळ यांनी उपस्थित केला आहे. आता विद्यार्थ्यांना गरज आहे. त्यावेळी रक्कम उपलब्ध केली जाईल असे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांची गरज ओळखून लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा करावी अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.







